गणेशोत्सवात रस्ते अडवून वाहतूक कोंडी करणारे गणेश मंडळांचे भलेमोठे मंडप, तसेच रुग्णालये व शाळांच्या परिसरात होणाऱ्या आवाजाच्या प्रदूषणाचा त्रास यावर एका संकेतस्थळाद्वारे नजर ठेवता येणार आहे. उत्सवाच्या काळात नागरिकांना खटकणाऱ्या अशा गोष्टी नागरिक पालिकेसारख्या यंत्रणेस संकेतस्थळाद्वारे नेमक्या ठिकाणासह कळवू शकणार आहेत. आतापर्यंत केवळ कल्पना स्तरावर असलेले हे संकेतस्थळ प्रत्यक्षात आले आहे, परंतु नागरिकांनी संकेतस्थळाला पुरवलेल्या माहितीवर प्रक्रिया करून पुढील कारवाईसाठी त्याचा वापर करण्याची यंत्रणा अद्याप उपलब्ध नाही.
‘प्रॅक्सिस मॅनेजमेंट कन्सल्टिंग’ या फर्मचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अभय कुलकर्णी यांनी https://punehabitat.crowdmap.com हे संकेतस्थळ तयार केले आहे. शहरातील नागरी समस्यांची माहिती एकत्र करण्यासाठी त्यांनी मांडलेल्या ‘क्राऊड मॅपिंग’ प्रकल्पाच्या संकल्पनेविषयी ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. आता या प्रकल्पासाठीचे संकेतस्थळ तयार झाले आहे. या संकेतस्थळावरील ‘सबमिट रिपोर्ट’ हा पर्याय वापरून नागरिक आपल्याला खटकलेल्या समस्येविषयी माहिती भरू शकतात व संकेतस्थळावरील नकाशावर ठराविक ठिकाणावर खूण करून ते देखील अचूकतेने दाखवून देऊ शकतात. मंडपांच्या अवाजवी मोठय़ा आकारामुळे वाहतुकीला झालेला अडथळा, ध्वनिक्षेपकांच्या भिंतींचा ठणठणाट अशा विविध गोष्टी छायाचित्रे काढून किंवा मोबाईलच्या साहाय्याने व्हिडिओ तयार करूनही या संकेतस्थळावर टाकता येऊ शकतील. रस्त्यावरील खड्डे, संशयास्पद रितीने होणारी वृक्षतोड, रस्त्यांवर व नदीपात्रात टाकला गेलेला राडारोडा आणि कचरा, फुटलेल्या मैलापाणी वाहिन्या, वाहतूककोंडी होईल अशा प्रकारे लावली जाणारी वाहने अशा विविध नागरी समस्यांविषयी माहिती देण्याची सोय या संकेतस्थळावर करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा