पिंपरी : करोना विषाणूंच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सगळेच जीवनमान बदलले आहे. हा बदल यंदाच्या गणेशोत्सवातही दिसणार आहे. नेहमीच्या दणक्यात आणि उत्साहात यंदा गणेशोत्सव साजरा करता येणार नसल्याची रुखरुख सर्वच स्तरावर आहे. शासकीय यंत्रणेसह अनेक घटकांवर असलेला ताण यंदा राहणार नाही.
गणेशोत्सवाची चाहूल लागताच मंडळांप्रमाणे शासकीय यंत्रणाही कामाला लागते, हा दरवर्षीचा अनुभव आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यापासून गणरायाचे आगमन ते विसर्जनापर्यंत सर्वाधिक ताण पोलिसांवरच असतो. मंडपाची परवानगी, विसर्जन घाट तयारी, निर्माल्य दान व्यवस्था अशी बरीच कामे महापालिकेला करावी लागतात. सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी अग्निशामक दलाला तत्पर राहावे लागते. यंदा करोनामुळे अशा कामांमधून शासकीय यंत्रणेची बऱ्यापैकी सुटका झालेली आहे.
उत्सवाकरिता वर्गणी, देणग्यांसाठी प्रायोजकत्व मिळवण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत असतात. त्यातून जाणते-अजाणतेपणे अनेक जण दुखावले जातात. यासाठी सक्ती होत असल्याच्या तक्रारीही दरवर्षी दाखल होतात. यंदा नागरिकांकडे पैसेच नाहीत, याची मंडळांना जाणीव असल्याने वर्गणीच न मागण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. महाआरतीचा मान देत मोठी वर्गणी मिळवण्याचा राजमार्ग म्हणून धनिकांना बोलावले जाते. राजकीय नेत्यांना पाच आकडी वर्गणीसाठी आग्रह असतो. यंदा तसे होण्याची शक्यता दिसत नाही. एकाच दिवशी २०-२५ मंडळांना भेटी देणारे नेत्यांचे दौरे दिसणार नाहीत. मंडळाशी संबंधित घटकांनाच हा मान यंदा दिला जाणार असल्याने त्यांचा उत्साहही दुणावणार आहे.
नेहमीच्या तुलनेत यंदा उत्सव काळात ताण कमी आहे. पालिकेचे स्वागत कक्ष नसतील. सजावट स्पर्धा होणार नाहीत. जनजागृती तसेच पर्यावरणपूरक उपक्रम नाहीत. उत्सवापूर्वी आणि उत्सवानंतर करावी लागणारी संबंधित कामे यंदा नाहीत. मात्र, आवश्यक कामांचेच नियोजन करावे लागेल. करोनाविषयक कामांना त्यामुळे अधिकाधिक वेळ देता येईल.
– अण्णा बोदडे, सहायक आयुक्त, पिंपरी पालिका.
करोनामुळे यंदाच्या उत्सवात दरवर्षीच्या तुलनेत पोलिसांवर कमी ताण आहे. उत्सव साजरा करण्याऱ्या मंडळांचे प्रमाणही यंदा कमी आहे. – श्रीधर जाधव, सहायक पोलीस आयुक्त