१२ मे रोजी झाली होती किशोर आवारे यांची हत्या म्हणून पोलिस पुण्याच्या तळेगावमध्ये कीटक गॅंग ची पिंपरी- चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने धिंड काढत तळेगावात कुठलीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराच दिला आहे. १२ मे रोजी किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर तळेगावातील वातावरण आणखी तापले होते. तळेगावमधील गुंडगिरी कमी करण्यासाठी गुंडा विरोधी पथक तळेगाव येथे ठाण मांडून बसले आहे. तळेगावात सुरू असलेली भाईगिरी आणि गुन्हेगारी कमी करण्याचे आव्हान पिंपरी- चिंचवड पोलिसांसमोर आहे. गेल्या काही महिन्यांपासून कीटक गॅंग गंभीर गुन्ह्यात सहभागी होत असल्याचे आढळल्याने नुकतच दरोडा आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.
कीटक भालेराव, वैभव विटे, विशाल मुंजाळ, प्रदीप वाघमारे, ऋतिक मेटकरी, आर्यन गरुड जुवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पैकी, कीटक भालेराव याच्यावर दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर, वैभव विटे याच्यावर आठ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. इतर साथीदारांवर देखील गुन्हे दाखल आहेत.
कीटक भालेराव हा कीटक गॅंग चा मुख्य मोरक्या असून त्याला आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश माने यांच्या टीम ने आवळल्या आहेत. गॅंग ने एका महिलेचा विनयभंग करून कोयत्याचा धाक दाखवत पैसे लूटले होते. या प्रकरणी तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कीटक गॅंगने सर्व गुन्हे तळेगाव हद्दीत केल्याने त्यांची धिंड काढून भयमुक्त तळेगाव करण्याचा मानस गुंडा विरोधी पथकाचा आहे. अशाच पद्धतीने गुन्हेगारांवर पोलिस वरचढ झाल्यास मावळमधील गुन्हेगारी नक्कीच कमी होऊ शकते. पोलिस आयुक्त विनायक चौबे यांचं देखील मावळमधील गुन्हेगारीवर विशेष लक्ष आहे.