लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून दोन लाखांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून रोकड, दुचाकी असा एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्वरुप राजेश चोपडे (वय २१, रा. मांजरी, हडपसर), राजन पटेल, अक्षय शाहू, अथर्व वाटकर, अमित शेरीया (सर्व रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येरवड्यातील तारकेश्वर मंदिर पांडवकालीन आहे. मंदिरात दानपेट्या आहेत. मंदिराच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. ४ जून रोजी पहाटे चोरट्यांनी मंदिरातील सहा दानपेट्या फोडून दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती.
पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पुणे-नगर रस्त्यावरील २०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पोलीस हवालदार किरण घुटे यांनी तांत्रिक तपास केला. संशयित आरोपी स्वरुप चोपडेला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने मंदिरातील दानपेट्या फोडल्याची कबुली दिली. आरेपी अथर्व वाटकरला नागपूरमधून अटक करण्यात आली.
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक छगन कापसे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, प्रवीण खाटमोडे, अनिल शिंदे, सूरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विशाल निलख यांनी ही कामगिरी केली.