पिंपरी- चिंचवड: चाकण एमआयडीसीमध्ये कामावरून घरी जाणाऱ्या कामगारांना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. या प्रकरणी चार जणांना म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. कृष्णा सुभाष सौराते, भीमराव ज्ञानोबा मुंडे, दीपक विनोद भगत आणि ऋषीकेश अर्जुन माळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रदीप बबन जाधव आणि धीरज अंबोरे अशी फरार आरोपींची नावे आहेत. त्यांचा शोध म्हाळुंगे पोलीस घेत आहेत.
चाकण, म्हाळुंगे एमआयडीसीमध्ये कामगारांना लुटण्याच्या घटना काही नवीन नाहीत. कामावरून घरी जात असताना कामगारांना लुटलं जातं. मारहाण करून त्यांच्याकडील मौल्यवान ऐवज, वस्तू काढून घेतल्या जातात. अशीच घटना मार्च महिन्यात जितेंद्र मोहन वायदंडे यांच्यासोबत घडली. सुट्टी झाल्याने वायदंडे कामावरून घरी जात होते. इंडोस्पेस कंपनी परिसरातील निर्जन स्थळी सहा जणांनी त्यांना अडवून लाथा, बुक्क्यांनी, पट्ट्याने आणि हॉकीस्टीक ने मारहाण करून त्यांच्याकडे मोबाईल आणि दुचाकी बळजबरीने काढून घेतली होती.
या प्रकरणाची म्हाळुंगे पोलिसांनी गंभीर दखल घेतली. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रारदार यांनी तक्रार दिली. तांत्रिक विश्लेषण करून नाणेकर वाडीतून चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या पथकाने केली आहे.