चिंचवड येथील पिंपळे पेट्रोलपंपावर जमा झालेली सोळा लाख ६५ हजार रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी नेत असताना लुटणाऱ्या टोळीतील दहा जणांस पोलिसांनी अटक केली आहे. ही रक्कम लुटण्याअगोदर आरोपींनी पंधरा दिवस पाळत ठेवून हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे. या गुन्ह्य़ात पोलिसांनी आठ लाख ६५ हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्य़ात वापरलेली आठ लाख रुपये किमतीची फियास्टा मोटार जप्त केली आहे.
अमोल सोमनाथ पाटील (वय २९), अमोल प्रकाश मोरे (वय २६), गणेश रघुनाथ अहिवळे (वय ३०, तिघेही रा. पिंपरी), अभिजित ऊर्फ दाद्या माणिक मोरे (वय २५, रा. संभाजीनगर, खराळवाडी), अनुराग मोहन ढमाले (वय १९, रा. एच कॉलनी, पिंपरी), आसिफ ऊर्फ जॉनी हबीब शेख (वय २०, रा. लोहियानगर), वाजित इसाक कुरेशी (वय १९, रा. भवानी पेठ), हाजिक आसिफ खान (वय १९, रा. रविवार पेठ), सूर्यकांत ऊर्फ पांडय़ा शिवलिंग कानाडे (वय २५, रा. मोरवाडी, पिंपरी) आणि शाहिद गफ्फार खान (वय २३, रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त जयंत नाईकनवरे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.
चिंचवड येथील पिंपळे पेट्रोलपंप येथे जमा झालेली रोकड बँकेत भरण्यासाठी घेऊन जाताना १६ जून रोजी सकाळी अॅक्टिव्हाला धडक देऊन पाडले. मोटारसायकलवरून आलेल्यांनी पैशाची बॅग चोरून नेली होती. या गुन्ह्य़ाचा तपास सुरू होता. पोलीस कर्मचारी नासीर पटेल यांना मिळालेल्या माहितीवरून या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी हे पाटील, मोरे आणि अहिवळे असून त्यांनीच पेट्रोल पंपावरील रक्कम लुटण्याचा कट रचला. त्यासाठी पंधरा दिवसांपासून आरोपी अहिवळे हा पेट्रोलपंपावर लक्ष ठेऊन होता. या गुन्ह्य़ासाठी आरोपींनी चोरीच्या तीन मोटार सायकलचा वापर केला असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल नसले, तरी या अशाच प्रकारचे त्यांनी काही गुन्हे केलेत का याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा