पुणे : सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात टोळक्याने दहशत माजविली. कोयते उगारुन टोळक्याने दुचाकी, रिक्षा, तसेच मोटारीच्या काचा फोडल्या. याप्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आनंद शाहू चव्हाण (वय ३४, रा. शिवमल्हार सोसायटी. कोंढवा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील पानमळा, दत्तवाडी, जनता वसाहत भागात मंगळवारी मध्यरात्री टोळके शिरले. टोळक्याने शिवीगाळ करून दहशत माजविली, तसेच कोयते उगारुन वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. टोळक्याने रस्त्यावर लावलेल्या दुचाकी, मोटारी, तसेच रिक्षांची तोडफोड केली. दहशत माजवून टोळके पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे तपास करत आहेत.

Story img Loader