गणेशोत्सवातील गर्दीत मोबाईल चोरी करण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील चोरट्यांच्या टोळीला सिंहगड पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून १५ लाख २५ हजार रुपयांचे ८४ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. चोरट्यांच्या टोळीने शहरातील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांकडील मोबाईल संच लांबविल्याचे तपासात उघड झाले आहे.
शरथ मंजूनाथ (वय २१), केशवा लिंगराजू (वय २४), नवीन हनुमानथाप्पा (वय १९, तिघे रा. भद्रावती, शिमोगा, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्यंची नावे आहेत. गणेशोत्सवात राज्याच्या वेगवेगळ्या भागातून भाविक दर्शनासाठी येतात. उत्सवाच्या कालावधीत मोबाईल चोरी करण्यासाठी शरथ, केशवा, नवीन शहरात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी मार्केट यार्ड, बालाजीनगर, स्वारगेट पीएमपी स्थानक, सिंहगड रस्त्यावरील अभिरुची परिसर, वडगाव भाजी मंडई परिसरासह गर्दीच्या ठिकाणांवरुन नागरिकांकडील मोबाईल संच लांबविले होते. सिंहगड रस्त्यावरील फन टाईम चित्रपटगृहाजवळ मोबाइल चोरट्यांची टोळी थांबल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले.
हेही वाचा : तृणधान्ये महागण्याची भीती; लागवड क्षेत्रात घट; तातडीने उपाययोजनांची गरज
शरथ, केशवा यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत मोबाईल संच आढळून आले. दोघांकडून ८४ मोबाईल संच जप्त करण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद वाघमारे, सचिन निकम, आबा उत्तेकर, संजय शिंदे, शंकर कुंभार, अमित बोडरे आदींनी ही कारवाई केली.
नागरिकांनी संपर्क साधावा
शहरातील गर्दीच्या ठिकाणांवरुन ज्या नागरिकांचे मोबाईल संच लांबविण्यात आले आहेत. त्यांनी सिंहगड पोलीस ठाणे (दूरध्वनी क्रमांक-०२०-४२६८२७०), अविनाश कोंडे (मोबाइल क्रमांक-९७६४६४७९६४), देवा चव्हाण (मोबाइल क्रमांक-८२०८११८६८२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी केले आहे.