लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : सराईत गुन्हेगार आणि त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांनी सोनसाखळी चोरी आणि वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. सराइताला पोलिसांनी अटक केली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य एक अल्पवयीन फरार आहे. त्यांच्याकडून सात लाख ७४ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नऊ गुन्हे उघड झाले आहेत.
आकाश वजीर राठोड (वय २४, रा. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी याबाबत माहिती दिली.
आणखी वाचा-पुणे : बदला घेण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड, एरंडवणेतील डीपी रस्त्यावर गुन्हे शाखेची कारवाई
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत सोनसाखळीच्या घटना दाखल होत्या. याबाबत तपास करताना पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवले. तसेच, गुन्हा घडलेल्या ठिकाणांवरील ‘सीसीटीव्ही फुटेज’चीही पाहणी केली. त्यावेळी त्यांना सराईत गुन्हेगार आकाश याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अन्य तीन साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यापैकी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
आरोपीकडून रावेत, निगडी, चिखली व आळंदी परिसरात सोनसाखळी आणि चाकण परिसरात वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून चोरलेले सात लाख ७४ हजार ८६० रुपये वजनाचे सोन्याचे दागिने व तीन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी आकाश याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये २१ गुन्ह्यांची नोंद आहे.