पिंपरी : विमानाच्या इंधानाचा काळाबाजार करुन वाढीव दराने विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सोमाटणे टोल नाक्याजवळ काळा बाजार सुरु असताना पोलिसांनी बुधवारी कारवाई करत इंधनाचे दोन टँकर ताब्यात घेतले आहेत.
मंगेश सखाराम दाभाडे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे), इलाही सैफन फरास (वय ४५, रा. धानोरी, पुणे), अनिल सतईराम जस्वाल (वय २८, रा. उत्तरप्रदेश), अमोल बाळासाहेब गराडे (वय ३१, रा. पिंपळखुटे, ता. मावळ) आणि परशुराम उर्फ सोन्या धोंडीबा गायकवाड (वय ३६, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सोमाटणे टोल नाक्याजवळ विमानाला लागणारे इंधन (एटीएफ/जेट इंधन) टँकरमधून काढून त्याची विक्री करण्याचा काळा बाजार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. जागा मालक मंगेश दाभाडे याने टँकर चालक ईलाही आणि अनिल या दोघांशी संगनमत करून अमोल आणि परशुराम याच्या मदतीने टँकरमधून जेट इंधन काढून घेत असताना त्यांना पोलिसांनी पकडले.
इंधन भरलेले टँकर नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरातून पुणे विमानतळावर येत असतात. टँकरमध्ये इंधन भरताना इंधनाच्या पृष्ठभागावर तवंग येतो. त्याच वेळी टँकरमधील इंधनाची मोजणी केली जाते. टँकर जेव्हा पुणे विमानतळावर येतो तेव्हा तवंग कमी झालेला असतो. त्यामुळे त्याची पातळी कमी दाखवली जाते. या तांत्रिक अडचणीचा फायदा आरोपींनी घेतला. हजारो लिटर इंधन भरलेल्या टँकरमधून ७० ते ८० लिटर इंधन काढून घेतल्यास कोणालाही संशय येत नव्हता. आरोपी चोरीचे इंधन काळ्या बाजारात चढ्या दराने विकत होते. आरोपींकडून एक हजार ५४० लिटर एटीएफ/जेट इंधन, रिकामे प्लास्टिक कॅन, लोखंडी टॉमी, इंधन मोजण्यासाठी लागणारी लोखंडी पट्टी असा एकूण एक लाख ६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्य आरोपी मंगेश दाभाडे याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.