काही वर्षांपूर्वी गुन्हेगारांना पकडण्यात खबऱ्यांचा वाटा महत्त्वाचा असायचा. खबऱ्यांच्या जाळ्याचा वापर करुन अनेक गंभीर गुन्ह्य़ांचा छडा पोलीस लावत असत. खबऱ्यांमुळे गुन्हेगार सापडल्याच्या रंजक कथा अनेकांच्या वाचनांतदेखील आल्या असतील. सध्याचे युग हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग आहे. पोलीस तपासात तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला आहे. त्याआधारे क्लिष्ट गुन्ह्य़ांचा छडा लावला जातो. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने प्रवाशांना लुटणाऱ्या परप्रांतीय टोळीला नुकतेच पकडले. विशेष म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून या गुन्ह्य़ाचा तपास करण्यात आला. मात्र, तांत्रिक तपास म्हणजे एक प्रकारची साधना आहे. तासन्तास बसून एकाग्र चित्ताने शेकडो गोष्टी पडताळाव्या लागतात. प्रवाशांना लुटणाऱ्या काही चोरटय़ांना पकडण्यासाठी पोलिसांनी शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि ते तपासण्यासाठी एका महिला पोलीस अधिकाऱ्याने सलग किती तरी दिवस परिश्रम घेतले. या तपासणीत अखेर चोरटय़ांवर शिक्कामोर्तब (झिरोइन) झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि पुणे शहरातील प्रवाशांना लुटण्याचे तब्बल पन्नास गुन्हे उघड झाले.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात पहाटेच्या वेळी बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गेल्या महिन्यात ९ सप्टेंबर रोजी पी. पूरमानंदन (रा. वेलचेरी, तामिळनाडू) हे पहाटे मुंबईहून रेल्वेने पुणे रेल्वेस्थानकात आले. तेथून ते रिक्षाने वारजे जकातनाका येथे निघाले होते. त्या वेळी महापालिकेजवळ आल्यानंतर रिक्षाचालकाने रिक्षा बंद पडल्याचा बहाणा केला. दरम्यान, रिक्षाचालकासोबत असलेले साथीदार जीपने तेथे आले आणि पूरमानंदन यांना वारजे येथे सोडण्याचा त्यांनी बहाणा केला. त्यानंतर पूरमानंदन जीपमध्ये बसले. प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेतील क्रेडीट कार्ड आणि १३०० रुपये चोरीला गेले. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रारअर्ज दिला.

पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा तपास सुरु केला. बाहेरगावांहून पुणे रेल्वेस्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांना लुटणाऱ्या चोरटय़ांची माहिती पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली. खबऱ्यांमार्फ त त्यांनी पुणे स्टेशन परिसरात वावरणाऱ्या चोरटय़ांचीही माहिती घेतली. दरम्यान, पोलिसांनी शहरातील वेगवेगळया भागात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये झालेले चित्रीकरण पडताळण्यास सुरुवात केली. सायबर गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी पुणे रेल्वे स्टेशन, महापालिका भवनजवळील पीएमपी स्थानक ते कोथरुड हा मार्ग चित्रीकरण तपासणीसाठी निश्चित केला. त्यांनी या मार्गावरील शेकडो कॅमेऱ्यांनी टिपलेले चित्रीकरण (फुटेज) पडताळण्याच्या कामाला सुरुवात केली.

हे चित्रीकरण कशा पद्धतीने तपासण्यात आले याची माहिती देताना सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार म्हणाले की, सीसीटीव्ही चित्रीकरण एकाग्रतेने पडताळण्यात सहायक निरीक्षक विजयमाला पवार यांनी अक्षरश: काही रात्री जागून काढल्या. पूरमानंदन यांच्या बॅगेतील क्रेडीट कार्ड चोरल्यानंतर शहरातील एटीएम सेंटरमधून रोकड काढण्यात आली होती. तसेच आरोपींनी पूरमानंदन यांना वारजेपर्यंत न सोडता त्यांना कोथरुडमधील कर्वे पुतळ्याजवळ सोडले होते. तेथील चित्रीकरणही पडताळण्यात आले.

जीपमध्ये पूरमानंदन यांना मुद्दामहून चालकाजवळ बसण्याची सूचना करण्यात आली होती. त्यांना बॅग मागे ठेवण्यास सांगण्यात आले होते. प्रवासा दरम्यान जीपमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या चोरटय़ांनी पूरमानंदन यांच्या बॅगेतील क्रेडीट कार्ड लांबविले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात चोरटय़ांचे वर्णन मिळाले. इंतजार अहमद इफ्तिखार अन्सारी (वय ३२, रा. भगतसिंगनगर, गोरेगांव, मुंबई) याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची माहितीही तपासादरम्यान मिळाली. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी सायबर गुन्हे शाखेचे पथक मुंबईला रवाना झाले आणि मुंबईत जाऊन त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या साथीदारांची नावेही निष्पन्न झाली. फुरकान अन्सारी, आरीफ अन्सारी, आशिक अन्सारी, सोहेल अन्सारी आणि नईम तेली (सर्व मूळ रा. गढी, जि.बिजनोर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढवा) या सर्वाना कोंढवा भागात पकडण्यात आले.

हे सर्व जण सदनिका भाडय़ाने घेऊन राहत होते. तसेच ते शिफ्ट पद्धतीवर रिक्षा चालवत होते. इंतजार अन्सारीने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती तपासात मिळाली. अन्सारीला मुंबईत पकडण्यात आले. पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक निरीक्षक विजयमाला पवार, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, कैलास गवते, अस्लम अत्तार, विजय पाटील, राजकुमार जाबा, राजू भिसे, अमित औचरे, उज्वला तांबे यांनी या गुन्ह्य़ाच्या तपासात विशेष परिश्रम घेतले. मुख्या आरोपीचे  साथीदार फुरकान, आरीफ, आशिक, सोहेल आणि नईम हे रिक्षाचालक आहेत. वर्षभरापासून या टोळीने पुणे शहर परिसरात रिक्षाप्रवाशांना लुटण्याचे पन्नासहून अधिक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. कोथरुड, बंडगार्डन, वानवडीसह वेगवेगळ्या भागात या टोळीने प्रवाशांना लुटण्याचे प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्याचेही पवार यांनी सांगितले. अनेक सीसी टीव्हींमध्ये झालेले चित्रीकरण योग्यरीत्या पडताळल्यामुळे अनेक गुन्ह्य़ांचा छडा लावण्यात पोलिसांना अशाप्रकारे यश आले.