लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पादचाऱ्यांचे मोबाइल संच हिसकावणारी चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने गजाआड केले. चोरट्यांकडून १४ मोबाइल संच, तसेच दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धनराज शिवाजी काळुंके (वय २१, रा. वाडेश्वरनगर, वडगाव शेरी, नगर रस्ता), वीरेंद्रकुमार जगदीशप्रसाद प्रजापती (वय २५, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ), किशोर सुरेश कोल्हे (वय ३०, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. काळुंके, प्रजापती, कोल्हे यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावले होते. सदाशिव पेठेतील हत्ती गणपती चौक परिसरात चोरट्यांची टोळी मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अनिकेत बाबर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. त्यांच्याकडून १४ मोबाइल संच, दुचाकी असा एक लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्यांनी शहराच्या मध्यभागात पादचाऱ्यांकडील मोबाइल हिसकावल्याचे तपासात उघड झाले आहे.
आणखी वाचा-पुणे: वैमनस्यातून तरुणाचे पिस्तुलाच्या धाकाने अपहरण करणारे अटकेत
विश्रामबाग, फरासखाना, समर्थ, दत्तवाडी, बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोबाइल हिसकावण्याचे आठ गुन्हे उघड झाले आहेत. आरोपी काळुंके सराइत चोरटा असून, त्याच्याविरुद्ध वाहनचोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, रमेश तापकीर, अजय जाधव, अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, निलेश साबळे, तुषार माळवदकर आदींनी ही कारवाई केली.