पुणे : विवाहित तरुणीला धमकावून पतीसह सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीसह शैलेंद्रकुमार, अतिशयकुमार, पवन राजेंद्र परदेशी, जितेंद्रकुमार, विजय बन्सी पवार (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तरुणीच्या वडिलांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित तरुणीचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर पतीने तिचा छळ करण्यास सुरूवात केली. पती मारहाण करत असल्याने तिच्या वडिलांनी तिला माहेरी आणले होते. पती नुकताच पुण्यात आला होता. त्याने तिला भेटण्यास बोलावले. त्यानंतर पती आणि त्याच्याबरोबर असलेल्या पाच मित्रांनी निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला. आरोपींनी मोबाइलवर चित्रीकरण केले. ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन अत्याचार करण्यात आल्याचे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.