लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शंकरशेठ रस्ता परिसरात मोटारचालकांकडे अपघात झाल्याची बतावणी करुन लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून मोबाइल संच, रोकड, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रवींद्र मधुकर ढावरे (वय ४५, रा. मंगळवार पेठ), प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे (वय २३), विशाल शंकर कसबे (वय २३), सुशील राजू मोरे (वय २०, तिघे. रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मोटारचालकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आणखी वाचा-पुणे: विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती! एक कार्यकर्ता विठुरायाकडे प्रार्थना करणारा देखावा
मोटारचालक तरुण शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकातून निघाला होता. त्यावेळी अपघात झाल्याची बतावणी करुन रिक्षाचालक आणि साथीदारांनी अडवले. मोटारचालक तरुणाला धमकावून रिक्षाचालक आणि साथीदारांनी त्याच्या खिशातील २० हजार रुपयांची रोकड आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले होते. तक्रारदार तरुण मूळचा छत्रपती संभाजीनगर परिसरातील आहे. त्याने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात आरोपी रिक्षाचालक ढावरे याला मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ढावरे याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले. चोरट्यांच्या टोळीने अपघात झाल्याच्या बतावणीने आणखी काही वाहनचालकांना लुटल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
आणखी वाचा-“…म्हणून एल्गार परिषदेचं आयोजन”, प्रकाश आंबेडकर यांचा भीमा-कोरेगाव आयोगासमोर दावा
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने, गुन्हे शाखेचे निरीक्षक संपतराव राऊत, सहाय्यक निरीक्षक राकेश जाधव, हनुमंत काळे, संदीप तळेकर, सागर घाडगे, अजीज बेग, मंगेश गायकवाड, रफीक नदाफ आदींनी ही कारवाई केली.