पुणे : दांडीया कार्यक्रमात टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना कात्रज भागातील संतोषनगर परिसरात घडली. याप्रकरणी सराइतासह साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अमीत चोरगे, अक्षय सावंत, अभी सावंत, अजय रांजणे, प्रसाद रांजणे यांच्यासह तीन ते चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन दिलीप मोरे (वय १९, रा. विश्वात्मक जंगली महाराज ट्र्स्ट, मोहिली, शहापूर, जि. ठाणे ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. मोरे याने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे आणि त्याचा मामाचा मुलगा कात्रज भागातील संतोषनगर परिसरात मंगळवारी रात्री दांडीयाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी सराइत अमित चोरगे आणि साथीदार तेथे आले. संतोषनगर परिसरात चोरगेची काहीजणांशी भांडणे झाली होती. वादातून चोरगे आणि साथीदारांनी दांडिया कार्यक्रमात कोयते उगारून दहशत माजविली.

हेही वाचा >>> पुणेकरांना ४४ कोटींचा ‘स्मार्ट’ हिसका, काय आहे प्रकरण!

टोळक्याने कोयते उगारल्याने दांडीया कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले नागरिक पळाले. माेरे आणि त्याचा मामाचा मुलगा तेथून पळाले. पळताना मोरे पडला. त्यावेळी चोरगे आणि साथीदारांनी रस्त्यात पडलेल्या मोरेवर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. चोरगे आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार दहशत माजवून पसार झाले. पसार झालेल्या चोरगे आणि साथीदारांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक समीर शेटे तपास करत आहेत.

हेही वाचा >>> Pune Porsche Crash Case : आरोपीला निबंध लिहायला सांगणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई

दांडीयात आणखी एकावर कोयत्याने वार दांडीया खेळताना झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी आठजणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. आनंद देवेंद्र मांगले (वय ४५, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत मांगले यांची पत्नी शीतल (वय ४३) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ईश्वर दांडेली, मारुती गवंडी, ऋषीकेश दांडेली, निखिल गवंडी, विशाल गवंडी, संतोष दांडेली, जावेद शेख, अनिकेत अनगल (सर्व रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री बी. टी. कवडे रस्त्यावरील शिव मित्र मंडळाकडून दांडीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वादातून राजवर्धन नुगला यास आरोपी मारुती गवंडी, ऋषीकेश गवंडी यांनी मारहाण केली. आनंद मांगले यांनी भांडणात मध्यस्थी केली. या कारणावरुन आरोपींनी मांगले यांच्यावर कोयत्याने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे तपास करत आहेत.