पिंपरी: चिंचवडमध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने कोट्यवधींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. महेश बापू लोंढे अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आत्तापर्यंत २५ जणांना आर्थिक गंडा घातला असून तीन कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्ष हरीश माने यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वडमुखवाडी येथे आरोपी महेश हा गृहप्रकल्प उभा करणार होता. तशी त्याने सर्व तयारी देखील केली. मात्र, २५ जणांकडून फ्लॅट देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन महेश पसार झाला. त्याने जवळपास तीन कोटींची फसवणूक केल्याचा अंदाजा आहे. २०१५ पासून पोलिसांना न सापडणारा महेश अखेर गुंडा विरोधी पथकाच्या हाती लागला आहे. त्याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी आणि दिघी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. महेश हा महाराजांसोबत राहून राजकीय व्यक्तीसोबत फोटो काढत असल्याचं देखील पुढे आल आहे. अनेक नामांकित राजकीय व्यक्तींसोबत त्याचे फोटो आहेत. आरोपी महेश आणि राजकीय व्यक्तींचा काही संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी हजरत पठाण, श्याम बाबा, नितीन गेंगजे, गणेश मेदगे यांनी केली आहे.