लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : खुनाच्या गुन्ह्यात संचित रजा (पॅरोल) मिळवून बाहेर आलेल्या गुंडाने एका व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने गुंडाला पानशेत परिसरातून अटक केली.
रोहित शंकर पासलकर (वय २३, रा. रुळे-मोरदरी, ता. वेल्हे, जि. पुणे ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पासलकर याच्याविरुद्ध खुनाचा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याने येरवडा कारागृहातून संचित रजा मिळवली होती. संचित रजा मिळवून बाहेर आलेल्या पासलकरने साथीदारांशी संगनमत करुन एका व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
आणखी वाचा-जालना येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हिंजवडीत कडकडीत बंद
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पासलकर पसार झाला होता. तो पानशेत परिसरात येणार असल्याची माहिती दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून पासलकरला पानशेत परिसरातून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, श्रीकांत दगडे, सुमीत ताकपेरे, महेश पाटील, गणेश ढगे यांनी ही कारवाई केली.