पुणे : दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्हयात फरार असलेल्या गुन्हेगाराचा पाठलाग करताना गुन्हेगाराने पोलीस पथकावर पिस्तूलातून गोळी झाडल्याने प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गुन्हेगारावर तीन गोळ्या झाडल्या. यानंतर त्याच्या दुचकीला गाडी आडवी घालून त्याला साथीदारासह जेरबंद केले. मुळशी तालुक्यातील मुठा गावजवळ मंगळवारी दुपारी ही थरारक घटना घडली.
नवनाथ निलेश वाडकर(वय १८ रा.जनता वसाहत, पर्वती) आणि केतन साळुंखे अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराची नावे आहेत. केतन साळुंखे हा स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पत्रकारावरील हल्यातील आरोपी आहे.
हेही वाचा >>> पुणे : मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार नवनाथ वाडकर सराईत गुन्हेगार आहे. तो सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. तेव्हा पोलिसांना हुलकावणी देत नवनाथने पळ काढला होता. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून खंडणी विरोधी पथक त्याच्या मागावर होते. तो मुठा परिसरात पिस्तूल घेऊन आला असल्याची खबर खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत चव्हाण यांचे पथक दोन मोटारींतून त्याच्या मागावर गेले.
एनडीए रस्ता येथे तो दुचाकीवरुन साथीदारासह जाताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केल्यावर त्याने पोलिसांवर पिस्तूलातून गोळी झाडली. मात्र, सुदैवाने ती कोणाला लागली नाही. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यानंतर गाडी त्याच्या दुचाकीला आडवी घालून दोघांनाही ताब्यात घेतले.
हेही वाचा >>> पुणे : बेपत्ता शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्तांकडून बक्षीस
जनता वसाहतीत वाडकर टोळीची दहशत
पर्वतीमध्ये निलेश वाडकर आणि चॉकलेट सुन्या अशा दोन टोळ्या आहेत. वर्चस्ववादातून दोन्ही टोळ्यांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. चॉकलेट सुन्याच्या टोळीने २०१८ मध्ये निलेश वाडकर याचा पर्वती पायथा येथे खून केला. त्यामध्ये चॉकलेट सुन्यासह २२ जणांना अटक करण्यात आली. चॉकलेट सुन्या आणि साथीदारांविरुद्ध मोका कारवाई करण्यात आली. निलेश वाडकरचा मुलगा नवनाथ हा अल्पवयीन होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची शपथ त्याने घेतली. वाडकर टोळीने चॉकलेट सुन्याच्या भावाचा खून केला. नवनाथने अल्पवयीन असतानाच दोन जणांच्या खुनाचा प्रयत्न केला. नवनाथवर अल्पवयीन असताना आठ गुन्हे दाखल झाले आहेत.