पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज ते डेक्कन येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही पदयात्रा शहराच्या मुख्य रस्त्यावरून आयोजित केल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. तर दुसऱ्या बाजूला काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीदेखील पदयात्रेत सहभागी झाले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यावरून महाविकास आघाडीतील नेते अधिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे २४ कोटींची मालमत्ता

भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पदयात्रेबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, एक वर्षभरापूर्वी कसबा पोटनिवडणूक झाली, त्यावेळी राज्यातील महायुती सरकारने माझ्या पराभवासाठी सर्व पद्धतीने ताकद लावली होती. अनेक भागांत गुंडदेखील उतरविले होते. पण, कसबा मतदारसंघातील नागरिक माझ्या पाठिशी राहिले आणि मला विजयीदेखील केले. मी आता लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीमध्येदेखील मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, माझ्या पाठिशी पुणेकर नागरिक राहतील आणि याही निवडणुकीत मला विजयी करतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

तसेच ते पुढे म्हणाले की, काल कोथरूड ते डेक्कनदरम्यान भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची पदयात्रा झाली. या पदयात्रेदरम्यान भाजपाचे अनेक नेतेमंडळी आणि नागरिकदेखील उपस्थित होते. पण, या पदयात्रेमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये, ही काळजी घेतली पाहिजे. मात्र, भाजपाच्या उमेदवारीने ती काळजी घेतली नाही. या त्रासाचे उत्तर पुणेकर नागरिक मतदानाच्या माध्यमातून निश्चितच देतील, तसेच या पदयात्रेकरिता पैसे देऊन बाहेरून नागरिक आणले गेले. त्याही पुढे जाऊन या पदयात्रेत गुंडांचादेखील समावेश होता, अशी माहिती समोर येत आहे. अशा शब्दात भाजपा नेत्यांना त्यांनी सुनावले.

हेही वाचा >>> शिवाजीराव आढळराव यांच्या मालमत्तेत सहा कोटींनी वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा होत आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, मागील दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे, त्यामुळे अनेक राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून गेली आहेत. यातून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या सभा होतील, तेथील भाजपाचा उमेदवार पडणार आहे. त्यामुळे यंदाची ही निवडणूक भावनेची न होता, भाकरीची झाली पाहिजे, अशी भूमिका मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी टोला लगावला.

भाजपाचाच देशभरातील महिलांच्या मंगळसूत्रावर डोळा : रविंद्र धंगेकर

काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर तुमचं मंगळसूत्र आणि सोनं चांदी हिसकावून घेईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील एका जाहीर सभेत बोलताना केला होता. त्या विधानावरून काँग्रेस पक्षाचे नेते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले असून त्याबाबतीत पुणे लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर म्हणाले की, देशात महागाई आणि बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. जनतेला घरातील दागिने विकून घर चालवावे लागत आहे. गरीब लोक रस्त्यावर आले आहेत. अशा घटनेतून मंगळसूत्रावर खरा डोळा भाजपाचाच आहे हे सिद्ध होतं, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर त्यांनी टीका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangster participating in murlidhar mohol election campaign says maha vikas aghadi candidate ravindra dhangekar svk 88 zws