खराडी येथील एका जमिनीच्या वादात तडजोड करावी म्हणून एका बांधकाम व्यावसायिकाला कुख्यात गुंड रवी पुजारीने परदेशातून फोन करून धमकाविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही तडजोडीची बोलणी करण्यासाठी पाठविलेल्या पुजारीच्या हस्तकाला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.
नरेश शिवराम शेट्टी (वय ४३, रा. मोरवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खराडी भागातील एका जमिनीचा वाद मिटवावा आणि त्यामध्ये बांधकाम व्यावसायिकाने तडजोड करावी म्हणून गुंड रवी पुजारीने व्यावसायिक आणि त्याचा व्यवस्थापकाला परदेशातून फोन केले. शेट्टी याला त्यांच्याशी तडजोडीची बोलणी करण्यास पाठविले होते. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने तडजोड करण्यास नकार दिल्यानंतर शेट्टीला धमकाविण्यास पाठविले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांकडे तक्रार देऊ नये म्हणून पुजारीने धमकाविले होते. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी शेट्टीला या प्रकरणी अटक केली. त्याला न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुजारी हा सध्या परदेशातून टोळी चालवित आहे. त्याच्या विरुद्ध विविध शहरांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा प्रकारचे चाळीस गुन्हे दाखल आहेत.

Story img Loader