लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरात कोयते, तलवारी उगारुन गुंडांकडून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. गोखलेनगर भागातील जनवाडी परिसरात तलवारी उगारुन गुंडांनी तीन दुकानांची तोडफोड केली. गुंडांनी एकावर तलवारीने एकावर वार केले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली.
योगेश अनंता गायकवाड, मयूर मोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुहास सुरेश माने (वय ३०, रा. शांतीनगर सोसायटी, सकाळनगर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड, मोरे सराइत आहेत. गायकवाड, मोरे आणि साथीदारांचे दोन दिवसांपूर्वी जनवाडी परिसरात एकाशी भांडण झाले होते. रात्री आठच्या सुमारास आरोपींनी तलवारी उगारुन परिसरात दहशत माजविली. त्यांनी राजकमल स्वीट मार्ट, अक्की मेन्स पार्लर, न्यू तृप्ती चिकन सेंटर या दुकानांची तोडफोड केली.
आणखी वाचा-बांगडीचे लटकन खेळताना चुकून लहान मुलीच्या नाकातून थेट फुफ्फुसात… डॉक्टरांनी दिले जीवदान
त्यावेळी तक्रारदार माने उपाहारगृहातून जेवण घेऊन घरी निघाले होते. दुकानांची तोडफोड करण्यात येत असल्याचे पाहून माने यांनी दुचाकी थांबविली. त्यावेळी आरोपींनी काय बघतो, अशी विचारणा केली. माने यांच्या खांद्यावर तलवारीने वार केले. तलवारी उगारुन परिसरात आरोपींनी परिसरात दहशत माजविली. दुकानदारांना धमकावून दुकाने बंद करण्यास सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करत आहेत.