भाईगिरीच्या हौसेपोटी परराज्यातून खरेदी; सहा महिन्यांत ७० पिस्तूल, १३८ काडतुसे जप्त

भाईगिरीचे आकर्षण आणि प्रतिस्पर्धी टोळीकडून हल्ला होण्याची भीती यांमुळे पुणे शहरात पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडांचा सुळसुळाट झाला आहे. बेकायदारित्या पिस्तूल बाळगले जात असून त्याचा उपयोग धाक दाखवण्यासाठी केला जात आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सहा महिन्यांत वेगवेगळ्या कारवायांमध्ये गुंडांकडून ७० पिस्तूल व १३८ काडतुसे जप्त केली आहेत. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून देशी बनावटीची पिस्तुले विक्रीसाठी पुण्यात येत असून शहरात खरेदी-विक्रीचा मोठा व्यवहार होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागातील जमिनींना गेल्या काही वर्षांत सोन्याचे भाव आले आहेत. जमीन खरेदीचा व्यवहार करण्यात आणि त्याचा बेकायदा ताबा घेण्यात गुंड टोळ्यांचे म्होरके व त्यांचे साथीदार हस्तक सक्रिय आहेत. गुंड टोळ्यांना काही बांधकाम व्यावसायिकांनी आर्थिक रसद पुरविली आहे. जमीन खरेदी-विक्री व्यवहार तसेच ताबा घेण्यात गुंड गजानन मारणे, बाबा बोडके, गणेश मारणे, शरद मोहोळ, बापू नायर टोळीचा दबदबा आहे. वर्चस्वाच्या वादातून दोन वर्षांपूर्वी टोळ्यांमध्ये रक्तरंजीत संघर्षदेखील झाला आहे. पोलिसांनी गेल्या वर्षभरात मारणे, मोहोळ, नायर  टोळीतील गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली. मोक्काअंतर्गत १२४ गुंडांवर कारवाई क रण्यात आल्यामुळे टोळीयुद्धाला लगाम घालण्यात पोलिसांना यश आले आहे.  गुंड टोळ्यांचे म्होरके कारागृहात असले तरी त्यांचे साथीदार प्रतिस्पर्धी टोळीकडून जीवाला धोका असल्याने पिस्तूल बाळगत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी कोथरूड भागात निखील खोमणे या गणेश मारणे टोळीतील गुंडाला शनिवारी अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुलांसह ६ काडतुसे जप्त करण्यात आली. प्रतिस्पर्धी शरद मोहोळ टोळीकडून जीवाला धोका असल्याने पिस्तूल बाळगल्याची कबुली त्याने दिली. मध्यंतरी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मध्य प्रदेशातून पुण्यात शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या दोघांना येरवडा भागात ताब्यात घेतले होते. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी पुण्यातील एका गुंडाला अटक करून त्याच्याकडून आठ पिस्तूल जप्त केली. त्याचे साथीदार तेथून पसार झाले होते. दरम्यान, मध्य प्रदेश पोलिसांनी एटीएसला माहिती दिल्यानंतर पसार झालेल्या गुंडांना पुण्यात पकडण्यात आले होते.

बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यांना पकडण्यासाठी सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

– सुरेश भोसले, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.

Story img Loader