पुणे : व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या गुंडांना विमानतळ पोलिसांनी अटक केली.रोहित नागेश कोळी (वय २२, रा. लोहगाव), सोमनाथ दीपक गायकवाड (वय २१, रा. विमाननगर) अशी अटक करण्यात आलेल्या सराइतांची नावे आहेत. विमाननगर भागातील गंगापूरम सोसायटी परिसरात ही घटना घडली होती. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली होती.
आरोपी कोळी आणि गायकवाड सराईत गुन्हेगार आहेत. गंगापूरम सोसायटी भागात काकाचा चहा नावाचे दुकान आहे. कोळी आणि गायकवाड दुकानात शिरले. व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणीची मागणी केली. व्यावसायिकाला मारहाण करून आरोपी पसार झाले. कोळी आणि गायकवाड म्हाडा कॉलनी परिसरातील मोकळ्या मैदानात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी दादासाहेब बर्डे, नाना कर्चे, योगेश थोपटे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आरोपींना अटक केली.
हेही वाचा >>>पुणे: दहावीची बनावट प्रमाणपत्रे देणारी टोळी गजाआड
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता माळी, सचिन जाधव, सचिन कदम, गिरीष नाणेकर आदींनी ही कारवाई केली.