पुणे : खुनाचा प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाला अमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोरमधून अटक केली. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
साहिल विनायक जगताप (वय २८, रा. केळेवाडी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. साहिल आणि साथीदारांविरुद्ध दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. कारागृहातून तो नुकताच सुटला आहे. तो अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती.
हेही वाचा – लोकजागर : पादचारी एक दिवसाचा राजा, अन्य दिवसांचे काय?
हेही वाचा – पिंपरी : कुदळवाडीतील अनधिकृत भंगार गोदामांबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय; सोमवारपासून…
जगताप अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी लोणी काळभोर परिसरातील टोलनाक्याजवळ सापळा लावून त्याला अटक केली. त्याच्याकडील पिशवीत तीन लाख रुपये किमतीचा गांजा आढळला. त्याने गांजा कोठून आणला, तसेच तो कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक शशिकांत खोसे, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, आदी पोलिसांनी ही कारवाई केली.