आपण ज्या उत्सवाची वाट वर्षभर पाहतो. तो म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाचा म्हणजेच गणेशोत्सव. गणपतीच्या दहा दिवसात प्रत्येकाच्या घरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. हा उत्सव पुण्यातील मंगळवार पेठेतील वसाहतीमध्ये १२ बाय १२ च्या खोलीत राहणारे मोहमद आणि मुमताज शेख हे दोघे पती पत्नी मागील २० वर्षापासून मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. मोहमद आणि मुमताज सध्या गणरायाची दररोज पूजा करतात. धर्माच्या भींती ओलंडून गणेशभक्तीत तल्लीन झालेल्या मोहमद आणि मुमताजचं समाजातील प्रत्येक घटकांकडून विशेष कौतुक होताना दिसतं. तर त्याही पुढे जाऊन त्यांच्या घरात एका बाजूला कुराआन, तर दुसर्‍या बाजूला भगवदगीता देखील पाहण्यास मिळते. आपल्या या कृतीमधून शेख कुटुंबीयांनी समाजाला धार्मिक एकतेचा संदेश देण्याचे काम केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहमद शेख, मुमताज शेख आणि त्याच्या दोन मुली शगुफ्ता, सुफीया असं त्यांचं चौकोनी कुटुंब आहे. पण शेख कुटुंब गणेशोत्सव का साजरा करतं याबद्दल विचारण्यात आलं असता त्याबद्दल मोहमद शेख यांच्या पत्नी मुमताज यांनी लोकसत्ता डॉटकॉमशी बोलताना माहिती दिली. “माझा भाऊ मंडळाचा अध्यक्ष असल्याने आमच्या परिसरात दरवर्षी गणपती बसवला जायचा, आम्ही तेव्हा दर्शनाला जात असायचो. त्याच दरम्यान मी खूप आजारी पडले. मी वाचण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी घरातील व्यक्तींना सांगितले. तेव्हा देवाकडे प्रार्थना केली की, मी यामधून बरी झाल्यावर माझ्या घरी तुझी प्राणप्रतिष्ठा करेल आणि देवाने देखील ते ऐकले. त्या आजारामधून मी ठणठणीत बरी झाले. त्यानंतर आमच्या घरी गणपती बसविण्यास सुरुवात झाली. तेव्हा अनेकांनी आम्हाला विरोध केला. मात्र आम्ही कोणाचेही ऐकले नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो आणि तेव्हापासून आजपर्यंत गणरायाची सेवा करतोय,” असं मुमताज म्हणाल्या.

गणपती बाप्पाला नैवेद्य आणि आरतीला होणारी गर्दी

आमच्या घरी गणपती बाप्पाची आम्ही दररोज आरती करतो आणि नैवेद्य देखील दाखविला जातो. आमच्या इथे गणपती बाप्पा विराजमान होत असल्याचे वसाहतीमध्ये सर्वांना माहिती आहे. त्यामुळे बच्चे कंपनीची आरतीच्या वेळी एकच गर्दी होते. ही गर्दी पाहून खूप आनंद होतो,” असं मुमताज सांगतात. “देवाकडे एकच प्रार्थना करते की आपल्यावरील करोना आजाराचे संकट नाहीसे होऊ दे. पुन्हा एकदा गुण्यागोविंदाने सर्व साजरे करू दे,” अशी भावना मुमताज शेख यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आम्ही आमचे सण आणि दररोज नमाज पठण देखील नियमानुसार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

…त्यामुळे आम्ही कायमची चांदीची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला

“मी टेलरिंगच्या कामानिमित्त मुंबईत काही वर्ष काम केले. तेव्हा गणेशोत्सव काळात चौपाटीवर जाणं होत असायचे. गणपती बापाच्या विसर्जनानंतर चौपाटीच्या एका कोपर्‍यात अनेक बापाच्या मूर्ती वाहून यायच्या. त्यांची अवस्था पाहून खूप वाईट वाटायचे. ज्या बाप्पाची आपण दहा दिवस मनोभावे पूजा करतो त्याच बाप्पाची अशी अवस्था पाहून मन उदास व्हायचे. त्या वर्षी पुण्यात आल्यावर आम्ही ठरविले की आता यापुढे शाडू मातीची मुर्ती घर आणण्याची नाही. त्याचवर्षी चांदीची मूर्ती आणली आणि तिची आजतागायत मनोभावे दररोज आम्ही सर्व नियम पाळून पूजा करीत आहोत. या २० वर्षाच्या काळात अनेकांनी विरोध केला. पण नेहमी एकच सांगत आलो आहे, जसे आपण इतर सण साजरे करतो तसे हा सण साजरा करण्यास काय हरकत आहे?” अशा शब्दांत विरोध करणार्‍यांचं मन वळवल्याचं मोहमद शेख यांनी सांगितले. आपण सर्वांनी सर्व सण एकत्रितपणे साजरे करुन गुण्यागोविंदाने राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati festival celebrated by sheikh family in pune svk 88 scsg