सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्तांसाठी पुण्यातील अनेक सामाजिक संस्था आणि गणेश मंडळांनी एकत्र येऊन तेथील गावांना चारा व पिण्याच्या पाण्याचे टँकर देण्याचा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाचा एक भाग म्हणून या गावांमध्ये एक टन चारा आणि ५१ टँकर पाणी देण्याचा कार्यक्रम बार्शी तालुक्यातील खांदवी, वाणेवाडी, तांदुळवाडी, कोरफळे आणि आणेवाडी येथे हा उपक्रम करण्यात आला.
सिंहगड रस्ता भागातील हिंगणे खुर्द येथील केदार मित्र मंडळ, विक्रम मित्र मंडळ, हिंदू साम्राज्य ग्रुप, एएए ग्रुप, ओंकार मित्र मंडळ, तसेच मंडई परिसरातील गोवर्धन फाउंडेशन, क्रियाशील फाउंडेशन, डीसी ग्रुप, फॉर आदर्स ग्रुप या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे हा उपक्रम सुरू केला आहे. या सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी वैयक्तिक सहभागातून निधी जमा केला असून त्याचा विनियोग सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळी भागात केला जाणार आहे. या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बार्शी तालुक्यात जाऊन तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला आणि तेथे सुरू असलेल्या छावण्यांसाठी चारा दिला. त्या बरोबरच पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणी देण्यासाठी या कार्यकर्त्यांनी पाण्याचे ५१ टँकर खरेदी केले आणि विविध गावांमध्ये हे पाणी पुरवण्यात आले. प्रतीक देसर्डा, सुनील मिश्रा, अमित गाडे, रवी देखणे, मयूर गांधी, मोहन पांगारे, संग्राम बलकवडे, रणजित निगडे, शुभम गुजराथी, सोनू सोनावणे, कुणाल दखणे आदींनी या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन केले.
या गावांमधील विहिरींमध्ये या टँकरचे पाणी सोडण्यात आले. चारा आणि टँकर गावांमध्ये पोहोचवण्यासाठी बार्शीतील जैन सामाजिक संस्थेची मदत झाली. या उपक्रमाचे गावांमधील नागरिकांनी कौतुक करत आम्हा सर्व कार्यकर्त्यांचेही मनापासून स्वागत केले, असा अनुभव प्रतीक देसर्डा यांनी सांगितला. अशा प्रकारे सर्वच मंडळे आणि संस्था साहाय्य कामासाठी एकत्र आल्या तर त्यातून मोठे काम उभे राहू शकेल आणि गावांनाही आवश्यक ती चांगली मदत देखील होईल, असेही ते म्हणाले.