संगीताला भाषा आहे ती स्वरांची. या भाषेमध्ये स्वरांचा सूक्ष्म विचार काय आहे याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. पण, आपण संगीताकडे केवळ राग आणि त्याचे नोटेशन या दृष्टिकोनातूनच पाहतो. एखाद्या देहाला नाव दिले जाते. पण, तो काय आहे हे त्याच्या सहवासात राहिल्याखेरीज समजणार नाही. तसे स्वरांकडे पाहिले पाहिजे. केवळ स्वरांच्या नावाकडे पाहून चालणार नाही, अशी भावना ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी रविवारी व्यक्त केली. ज्याला ताल नाही आणि नाव नाही तो स्वर किती व्यापक आहे, असेच मी पाहते. असा अभ्यास केला तर परब्रह्म भेटेल. आजच्यापेक्षा उद्या माझं गाणं चांगलं झालं आणि देवाने ते ऐकले तर, मला आनंद होईल, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली.
संगीत क्षेत्रातील अलौकिक योगदानाबद्दल सुवर्ण कडे प्रदान करून शिष्यांतर्फे किशोरीताईंचा सन्मान करण्यात आला. नाटय़संपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित गानसरस्वती महोत्सवात गायक रघुनंदन पणशीकर, गायिका नंदिनी बेडेकर, तेजश्री आमोणकर आणि अपर्णा पणशीकर या शिष्यांनी पाद्यपूजा करून किशोरीताईंचा सत्कार केला. हा सन्मान होत असताना रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजर करीत ‘गानसरस्वती’ला मानवंदना दिली. ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक आणि संगीत समीक्षक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना आणि सुभाष सराफ या प्रसंगी उपस्थित होते.
किशोरी आमोणकर म्हणाल्या, ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’, अशीच सर्वाची अवस्था झाली आहे. तुमच्यासमोर ही किशोरी उभी आहे. एक शरीर जे आज ना उद्या कधीतरी संपायचं आहे. पण, ही मुले आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने गुरू म्हणून किशोरी समजली. गुरू म्हणजे ज्ञान. त्यामुळे गुरू बदलतो. पण, ज्ञान बदलत नाही. ज्ञानाची पिपासा या मुलांना आहे तशी ती मलाही आहे. अपरंपार ज्ञानामध्ये मी संगीत हा छोटासा विषय घेऊन आली आहे. माई म्हणजेच मोगुबाई कुर्डीकर, मला आकारामध्ये शिकवायची. प्रत्येक रागातील गंधार कसा बदलतो हे मी शिकले म्हणून मला समजले. सध्या प्रत्येकाला ‘इन्स्टंट’ हवे आहे. पण, ते मिळणार नाही. सूर्य दोन तासात उगवत नसतो. दिवस २४ तासांचाच असतो. हे न बदलणारे सत्य स्वरभाषेतून पाहिले पाहिजे. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी श्रोत्यांसाठी सर्वज्ञ हा शब्द वापरला आहे. एका अर्थाने तुम्ही श्रोते परमेश्वराचे स्वरूप आहात.
मुकुंद संगोराम म्हणाले, संगीतावर तंत्रज्ञानाचे वर्चस्व वाढत असतानाच्या काळात प्रज्ञा आणि प्रतिभेच्या ताकदीवर स्वत:चे संगीत निर्माण करण्याची क्षमता केवळ किशोरीताईंमध्येच आहे. त्यांनी केवळ गायन केले नाही. तर, निर्मितीचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न केला. विचारवंत संगीतकार अशा किशोरीताईंच्या ऋणामध्येच राहिले पाहिजे. गुरुमुखी विद्या सादर करताना त्यांनी आपल्या प्रतिभेची जोड दिली. घराणेदार गायकीमध्ये शास्त्राबरोबर सौंदर्याचा प्राण त्यांनी फुंकला. गाण्यामध्ये ‘क्लासिकल रोमँटिसिझम’ आला पाहिजे हे त्यांनी खूप आधी ओळखले होते.
रसिकांनी अनुभवलं ‘ताईं’च्या स्वरांचं चांदणं
गानसरस्वती महोत्सवात रविवारी सकाळच्या सत्रामध्ये रसिकांनी किशोरीताईंच्या स्वरांचं चांदणं अनुभवलं. ‘देवगिरी बिलावल’ आणि ‘खट’ या रागांचे सौंदर्य त्यांच्या प्रतिभासंपन्न गायकीतून उलगडले. ही अनुपम स्वरमैफल म्हणजे रसिकांसाठी ‘मर्मबंधातली ठेव’ ठरली. त्यापूर्वी मिलिंद रायकर (व्हायोलिन) आणि रवी चारी (सतार) यांची जुगलबंदी झाली. सायंकाळच्या सत्रात रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने रंग भरला. ‘गानसरस्वती को भजे हम’ या रचनेतून त्यांनी किशोरीताईंना अभिवादन केले. बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता झाली.
संगीत म्हणजे नोटेशन नव्हे, ही तर स्वरभाषा – किशोरी आमोणकर
संगीताला भाषा आहे ती स्वरांची. या भाषेमध्ये स्वरांचा सूक्ष्म विचार काय आहे याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. पण, आपण संगीताकडे केवळ राग आणि त्याचे नोटेशन या दृष्टिकोनातूनच पाहतो. एखाद्या देहाला नाव दिले जाते. पण, तो काय आहे हे त्याच्या सहवासात राहिल्याखेरीज समजणार नाही. तसे स्वरांकडे पाहिले पाहिजे. केवळ स्वरांच्या नावाकडे पाहून चालणार नाही, अशी भावना ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी रविवारी व्यक्त केली.

First published on: 04-03-2013 at 01:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gansaraswati kishori amonkar felicitated by disciples