पुणे : नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका-गुरु मीरा पणशीकर यांना यंदाचा गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ संवादिनीवादक पं. प्रमोद मराठे व डॉ. अरविंद थत्ते यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार जाहीर झाला आहे.कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या ११ व्या गानसरस्वती महोत्सवात हे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
गानसरस्वती महोत्सवाशी अनेक वर्षे संबंधित असलेले उद्योजक अजित बेलवलकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या वर्षीपासून गानसरस्वती महोत्सवात अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय नाट्यसंपदा प्रतिष्ठान परिवार आणि बेलवलकर कुटुंबीयांनी घेतला असून यावर्षीचा पहिला अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार सरोदवादक अनुपम जोशी यांना प्रदान करण्यात येईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि प्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर यांनी दिली.