घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या कामाकरिता वाहनचालक व कचरा वेचक पुरवणाऱ्या कागद, काच पत्रा संघटनेला पिंपरी पालिकेने आता ‘पर्याय’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ही संघटना सतत आंदोलन करते व त्यामुळे आम्हाला त्रास होतो, असे कारण देण्यात आले आहे.
पिंपरी पालिकेकडून घरोघरी कचरा विलगीकरण करण्याच्या कामासाठी खासगी संस्थांकडून निविदा मागवण्यात येतात. हे काम कागद, काच पत्रा संघटनेच्या कचरा वेचकांना प्राधान्याने देण्यात यावे, असे या संदर्भातील निविदेत नमूद करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंतचा अनुभव पाहता ही संघटना अनेकदा काम बंद करते, कधीही संप पुकारते, आंदोलने करते, गैरवर्तन करते, असा ठपका पालिकेने ठेवला आहे. संघटनेच्या अशा वागण्याचा फटका पालिकेला बसतो, त्याचप्रमाणे, नागरिकांनाही बसतो. हे काम आरोग्याशी निगडित असल्याने अशाप्रकारे काम बंद पडल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केवळ याच संघटनेवर अवलंबून न राहता निविदा प्राप्त झालेल्या संबंधित ठेकेदारी संस्थेस हे काम द्यावे लागणार आहे, असे याबाबतच्या नव्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातील स्थानिक कचरा वेचकांवर अन्याय होणार नाही, त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल, असा युक्तिवादही करण्यात आला आहे. स्थायी समितीने या प्रस्तावास मान्यताही दिली आहे. त्यानुसार, ‘फ’, ‘ड’ आणि ‘अ’ या तीन क्षेत्रीय कार्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
सतत आंदोलने करतात म्हणून कागद, काच पत्रा संघटनेला ‘पर्याय’
हे काम कागद, काच पत्रा संघटनेच्या कचरा वेचकांना प्राधान्याने देण्यात यावे, असे या संदर्भातील निविदेत नमूद करण्यात आले आहे. मात्र...
First published on: 02-07-2015 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage bifurcation pcmc contract