पुणे शहरापुढे असलेला कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेकविध उपाय केले जात असताना आणि अनेक पर्याय समोर येत असताना घनकचऱ्यापासून विटा तयार करण्याची नवी योजना आता प्रस्तावित करण्यात आली आहे. ही योजना यशस्वीरीत्या राबवली गेल्यास कचरा विल्हेवाटीबरोबरच बांधकामांनाही उच्च प्रतीचा कच्चा माल मिळू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.
शहरात सध्या रोज २२०० टन कचरा तयार होत असून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून शेकडो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. ओल्या कचऱ्यापासून खत, वीज, गॅस तयार करण्याचे काही प्रकल्प शहरात सुरू आहेत, तर सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचेही काही प्रकल्प शहरात आहेत. तरीही कचराविल्हेवाटीचा प्रश्न कायम असून त्यावर उपाय म्हणून आता कचऱ्यापासून विटा ही योजना महापालिकेसमोर मांडण्यात आली आहे. नगरसेवक आबा बागूल आणि वास्तुरचनाकार आनंद उपळेकर यांनी या नव्या योजनेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने संबंधित काही अधिकारी व लोकप्रतिनिधींसमोर या योजनेचा आराखडाही सादर करण्यात आला.
घनकचऱ्यापासून विटा तयार करण्याचे हे तंत्रज्ञान ब्राझीलने विकसित केले आहे आणि जगातील अनेक शहरांमध्ये आता त्याचा वापर होत आहे. या प्रक्रियेत घनकचऱ्याचे यांत्रिक पद्धतीने वर्गीकरण केले जाते आणि कचऱ्यातील लोखंड व प्लॅस्टिक वेगळे केले जाते. त्यानंतर हा संपूर्ण कचरा र्निजतुक केला जातो. उर्वरित कचऱ्यावर मोठा दाब देऊन पाडवर केली जाते. त्यात विशिष्ट रसायने व योग्य प्रमाणात माती आणि अल्प प्रमाणात सिमेंट मिसळले जाते. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये एकजीव केले जाते. हे मिश्रण मिक्सरमधून बाहेर येतानाच त्याच्या विविध आकारातील विटा तयार होतात. दोन दिवसांमध्ये या विटांमधील आद्र्रता शोषून घेतली जाते आणि नंतर या विटा बांधकामाला वापरण्यायोग्य होतात, अशी माहिती बागूल यांनी दिली.
या विटा तयार करण्यासाठी जो खर्च महापालिकेला येईल तो खर्च विटांच्या विक्रीतून भरून निघू शकतो. शहराच्या विविध भागांमध्ये विटा तयार करण्याचे छोटे व मध्यम आकाराचे प्रकल्प उभारल्यास कचराविल्हेवाटीच्या दृष्टीने सोय होऊ शकते. या विटांना कोणतीही दरुगधी नसते, तसेच तयार झालेली वीट कचऱ्यापासून तयार केली आहे हेही समजून येत नाही. या तंत्रज्ञानाचा वापर शहरात झाल्यास अन्य शहरे देखील या योजनेचे अनुकरण करतील, असा विश्वास उपळेकर यांनी व्यक्त केला आहे.
कचऱ्यापासून विटांचे वैशिष्टय़
इतर विटांच्या तुलनेत निम्म्याहून कमी वजन.
विटांची ताकद इतर विटांपेक्षा पाचपट अधिक.
बांधकामात रसायनांद्वारे चिकटवल्या जातात.
या विटांवर प्लॅस्टरिंग तसेच रंगकामही करता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा