एसएनडीटी समोरील कालव्याचा रस्ता वारज्यापर्यंत जात असल्यामुळे या रस्त्याचा वाहनचालकांकडून मोठय़ा प्रमाणावर वापर होत आहे. या रस्त्यावर महापालिकेच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या पाईपचा अडथळा गेले तीन-चार महिने होत असून या पाईपमुळे कचराही मोठा प्रमाणावर साठत असल्याची तक्रार क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संदीप खर्डेकर यांनी ही तक्रार क्षेत्रीय अधिकारी उमेश माळी यांच्याकडे केली असून कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कालव्यावरील रस्त्याचा वापर वाहनचालकांकडून मोठय़ा प्रमाणावर होतो. मात्र, करिष्मा चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यात महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांना अपयश येत आहे. कालवा रस्त्यावरील वाहतुकीला या ठिकाणी ठेवल्या जात असलेल्या बॅरिकेडस्चा अडथळा वाहनचालकांना होत असल्याचे खर्डेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यास वाहनचालकांच्या अडचणी लक्षात येतील, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
याच चौकात गेल्या तीन-चार महिन्यांपासून महापालिकेच्या कामासाठी आणलेले मोठे पाईप पडले आहेत. त्यामुळे देखील वाहतुकीला अडथळा होत असून पाईपच्या बाजूने कचरा व राडारोडाही टाकला जात आहे. ही उपाययोजना केल्यास येथील वाहतूक सुरळीत होऊ शकेल, असेही खर्डेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

Story img Loader