कचऱ्याचे विभाजन आणि कचरा विल्हेवाट यासंबंधात महापालिका प्रशासनाला कामगारांची चांगली साथ मिळते. कचरा विभाजनाबाबत आता कामगारांकडूनच संशोधन केले जाणार आहे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी केले.
महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामार्फत सावित्रीबाई फुले स्मारक येथे महापालिका आणि महापालिका कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने कचरा विभाजन संशोधन प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भवानी पेठ प्रभाग समितीचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे, सुधीर जानजोत, संघटनेच्या नेत्या मुक्ता मनोहर तसेच डॉ. आनंद करंदीकर, उपायुक्त सुरेश जगताप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शहरात कचऱ्याची समस्या असून त्यावर उपाय शोधण्यासाठी आता कामगारच प्रयत्न करणार आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. पुण्यातील प्रकल्पांची देशपातळीवर दखल घेतली जाते आणि असे प्रकल्प साकारण्यात कामगार संघटनेचा खूप मोठा सहभाग असतो, असे आयुक्त म्हणाले. कचऱ्यात काम करणाऱ्या कामगारांना जी कामे आज करावी लागतात त्याबाबत प्रशासन व नागरिकांनी एकत्र येऊन ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
शहराची लोकसंख्या चाळीस लाखांपर्यंत पोहोचली असली तरी शहराची स्वच्छता करण्यासासाठी असलेल्या कामगारांची संख्या मात्र अपुरी आहे. शहराचा या कामाबाबतचा दृष्टिकोनही चांगला नाही. कचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो त्याच ठिकाणी वर्गीकृत केला गेला पाहिजे असे न्यायालयाचे आदेश असतानाही शहरातील नागरिकांचा त्याबाबतचा सहभाग अपुरा आहे. अशा परिस्थितीत कामगारांकडून कचरा वर्गीकरणाबाबत जे संशोधन व प्रयोग होणार आहेत ते फायदेशीर ठरतील तसेच त्यातून जागृती देखील होईल, असे डॉ. करंदीकर यांनी यावेळी सांगितले.
अशा प्रकारच्या संशोधन प्रकल्पाची शहराला गरज असून नागरिकांमध्ये जागृती करण्याचीही मोठी गरज आहे. त्या दृष्टीने जे उपक्रम केले जातील त्यांना आम्ही नगरसेवक म्हणून निश्चितपणे मदत करू, असे नगरसेवक बागवे यांनी यावेळी सांगितले. सहायक आयुक्त अरुण खिलारी यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader