पुणे : शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन आणि संकलन योग्य पद्धतीने होते की नाही, हे पाहण्यासाठी आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेकडून संगणकप्रणाली विकसित केली जाणार आहे. कचऱ्याचे संकलन, वाहतूक आणि अन्य प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून, कचरा वाहतुकीच्या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा तर कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्मार्ट वाॅच दिले जाणार आहे. त्यासाठी पंधरा कोटींच्या खर्चाला महापालिकेने मान्यता दिली आहे. बाणेर, बालेवाडी भागातून सध्या हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे.
शहराची जुनी हद्द आणि महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा मिळून एकूण २ हजार २०० टनापर्यंत कचरा निर्माण होतो. निर्माण झालेल्या कचऱ्याचे संकलन करणे, वाहतूक करणे आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची कामे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून केली जातात. त्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेचे ३ हजार ५०० आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ७ हजार ५०० कर्मचारी सध्या उपलब्ध आहेत. कचरा वाहतुकीसाठी सातशेहून अधिक गाड्यांचा वापर केला जात आहे. मात्र कर्मचाऱ्यांकडून वेळेवर कामे होत नसल्याचे आणि कर्मचारी कामावर येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. तसेच काही कर्मचाऱ्यांनी पगारी सफाई कर्मचारी ठेवले असून त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेतली जात असल्याचे प्रकारही पुढे आले होते. या कामचुकार कर्मचाऱ्यांना लगाम घालण्याचा निर्णय महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतला आहे.
कचरा संकलन, वाहतूक आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित केली जाणार आहे. त्यासाठी १५ कोटी ६१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षत असून खर्चाला आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली आहे. या प्रणाली अंतर्गत रस्त्यावरील कचरा संकलन करणारे कर्मचारी घरोघरी जाऊन कचरा संकलन करणारे, घंटागाडी आणि इतर गाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्मार्ट वॉच दिले जाणार आहे. त्यामुळे ते कामावर केव्हा आले, कोणत्या भागात काम केले, किती वेळ केले याची माहिती मिळणार आहे. कचरा वाहतुकीच्या गाड्यांनाही जीपीएस यंत्रणा लावण्यात येणार असून संकलन केंद्र रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीटीफिकेशनने जोडले जाणार आहेत. महापालिकेच्या इमारतीमधील नियंत्रण कक्षातून त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
औंध, बाणेरमध्ये उपक्रमाला प्रारंभ
औंध, बाणेर आणि बालेवाडी या भागातून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू असून येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्व भागात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. औंध, बाणेर, बालेवाडी भागासाठी ३२ गाड्या आणि ९०० कर्मचारी आहेत. या उपक्रमाला स्मार्ट सिटीचेही सहकार्य मिळाले आहे.