पुणे : शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर रात्री उशिरा, तसेच पहाटेच्या वेळी कचरा टाकला जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाने रात्रीदेखील स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कचरा गोळा करण्यासाठी ८१ नवीन वाहने विकत घेण्यात आली असून, ही वाहने रात्री ज्या रस्त्यांवर कचरा टाकला जातो, तेथे फिरणार आहेत. रात्री आणि पहाटे कचरा टाकताना आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
शहरातील चौकांमध्ये तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवर असलेल्या कचराकुंड्या महापालिकेने काढून टाकल्या आहेत. जागोजागी महापालिकेचा कचरा गोळा करणारी वाहने फिरत असतात. सकाळपासून महापालिकेच्या घनकचरा विभागाची वाहने सर्वत्र फिरून शहरातील कचरा गोळा करतात. महापालिका रोजच्या रोज कचरा उचलत असतानाही काही नागरिक रात्री उशिरा तसेच पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडल्यानंतर रस्त्यांवर कचरा टाकत असल्याचे प्रकार समोर आले होते.
हेही वाचा – कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून पथके देखील तयार केली आहेत. त्यांच्यामार्फत गस्त घातली जाते. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे महापालिकेच्या लक्षात आले.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार या वाहनांचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी वाहनांवर स्पीकर बसवण्यात आले आहेत. जुन्या आणि नवीन अशा एकूण ३५१ घंटागाड्या महापालिकेकडे आहेत. कचरा रात्री उचलला जावा यासाठी चालक आणि कर्मचारी यांची उपलब्धता येत्या आठवड्याभरात होईल. यानंतर रात्रीच कचरा उचलण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर कचरा दिसणार नाही, असा विश्वास घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?
अनेक भागात कचराकुंड्या नसतानाही रात्रीच्यावेळी रस्त्यावर कचरा टाकण्यात येतो. रात्री रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने नवीन ८१ कचरा उचलण्यासाठी वाहनांची खरेदी केली आहे. पुढील आठ दिवसांत याचे नियोजन करून रात्रीच्यावेळी कचरा उचलला जाणार आहे, असे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.