अवघ्या चोवीस तासांत ओल्या कचऱ्याचे विघटन करुन त्यापासून खत तयार करणारे एक स्वयंचलित यंत्र बाजारात आले आहे. उष्णता आणि विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा वापर करुन या यंत्रात खत तयार होऊ शकते.
‘रॅडोनॅचुरा’ या कंपनीचे अध्यक्ष अभिषेक गुप्ता यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ‘आर-नेचर’ हे कचरा विघटनाचे विजेवर चालणारे यंत्र पुण्याच्या बाजारपेठेत सादर केल्याची घोषणा केली. वेगळा केलेला ओला कचरा या यंत्रात टाकल्यानंतर यंत्रातील आर्द्रतामापक यंत्रणेद्वारे कचऱ्यातील ओलसरपणा मोजला जातो. त्यानंतर यंत्राच्या आत सावकाश कचरा हलवला जातो आणि कचऱ्याला उष्णता देऊन त्यातील ओलेपणा कमी केला जातो. सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियेद्वारे कचऱ्याचे चोवीस तासांत विघटन होते, अशी माहिती गुप्ता यांनी दिली. साधारणत: १०० किलो कचऱ्यातून यंत्राद्वारे १० ते २० किलो खत तयार केले जाते. हे यंत्र सध्या २५ किलो ते २ टनांपर्यंत वेगवेगळ्या वजनाच्या विघटन क्षमतेत उपलब्ध आहे. त्याची किंमत मात्र वजनानुसार २.७ लाख ते ५५ लाख रुपयांपर्यंत आहे.
यंत्राद्वारे तयार केलेले खत विकत घेण्याची योजनाही कंपनीतर्फे सुरू करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. ‘एकूण तयार होणाऱ्या कचऱ्यापैकी साधारणपणे ५३ टक्के ओला कचरा असतो, ३१ टक्के कोरडा कचरा, तर १६ टक्के ‘मिक्स्ड वेस्ट’ (उदा. सॅनिटरी नॅपकिन, इ-कचरा इ.) असतो. या यंत्रात केवळ ओल्या कचऱ्याचे विघटन होत असले तरी किरकोळ प्रमाणात कागद व प्लॅस्टिक त्यात चालू शकते,’ असेही ते म्हणाले.

Story img Loader