सुरुवातीला बाराशे-पंधराशे रुपये खर्च केले की झालं.. सुरुवातीलाच योग्य काळजी घेतली की मग रोज एक रुपयात घरातील ओल्या कचऱ्याचा प्रश्न पूर्णपणे सुटतो. या प्रक्रियेत उत्तम खत निर्माण होते हा फायदा वेगळाच!
‘नो यूवर फाउंडेशन’ या अशासकीय संस्थेच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ नॅचरल ऑरगॅनिक अॅग्रिकल्चर’ (इनोरा) या सेंद्रिय शेतीबाबतच्या विभागाच्या वतीने हे उपक्रम राबविले जातात. लोकांना कचऱ्याच्या समस्येबाबत जागरूक करणे, त्याबाबत प्रशिक्षण देणे, प्रात्यक्षिक दाखविणे आणि त्यांच्यापर्यंत याबाबतचे तंत्रज्ञान पोहोचवणे या हेतूने हा उपक्रम गेली काही वर्षे सुरू आहे. संस्थेतर्फे संशोधनाचे काम २००० सालापूर्वीपासून सुरू आहे. त्यानंतर हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू झाले. त्याला गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये वेग आला आहे. त्यांच्याशी सुमारे सहा-सात हजार कुटुंबे जोडली गेली आहेत. त्यात अनेक मोठय़ा सोसायटय़ांचा समावेश आहे आणि पुण्यातील १५ शाळांचासुद्धा समावेश आहे.
ओला कचरा जिरविण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. ते शक्यही आहे. ते करताना लोकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि त्यांना त्यासाठीचे जीवाणू कल्चर, साधने व शास्त्रीय ज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेतर्फे केले जाते.
ओला कचरा कसा जिरवला जातो?
– कचरा साठविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कंटेनरचा उपयोग केला जातो.
– त्यात दगड, वाळू, काथ्या, शेणखत / कंपोस्ट असे वेगवेगळे थर दिले जातात.
– त्यावर रोजचा ओला कचरा व विशिष्ट प्रमाणात पाणी टाकले जाते.
– दर आठ दिवसांनी हा कचरा हलवावा लागतो.
– त्यावर जीवाणू कल्चर टाकले जाते.
– दोन ते अडीच महिन्यांनंतर त्याचे खत तयार होते.
कोणकोणत्या कचऱ्याचे व्यवस्थापन शक्य?
– घर, सोसायटय़ा, कार्यालयातील कचरा
– कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिती
– मोठय़ा प्रमाणात कचरा असल्यास वायूनिर्मिती
ओला कचरा व्यवस्थापनाचा कुटुंबाचा खर्च :
– सुरुवातीच्या कंटेनरसाठी १२०० ते १५०० रुपये
– कंपोस्टसाठी प्रतिमहिना३० रुपये (दररोज १ रुपया)
– याद्वारे रोपांसाठी खतही उपलब्ध होते
लागणारी जागा- साडेतीन फूट बाय साडेतीन फूट (सुमारे एक चौरस मीटर)
संपर्कासाठी ई-मेल : inora@inoraindia.com / आमची कॉलनी, आलिशा होम, बावधन, पुणे- २१
‘‘कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान लोकांना व्यवस्थित समजावून सांगणे, सुरुवातीला काटेकोरपणे व्यवस्था उभी करून देणे, व्यवस्थित प्रशिक्षण देणे आणि लोकसहभागातून पाठपुरावा करणे हे संस्थेतर्फे केले जाते. त्याला पुण्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे सहा-सात हजार कुटुंबे सहभागी झाली आहेत. अनेक सोसायटय़ा, शाळांचाही समावेश आहे. त्याचा अधिकाधिक लोकांनी स्वीकार केल्यास कचऱ्याची समस्या हलकी होऊ शकेल.’’
– मंजुश्री तडवळकर (अध्यक्ष, नो हाऊ फाउंडेशन)