पिंपरी-चिंचवडमध्ये ठिकाणे निश्चित; महापालिकेकडून कचरा उचलण्याची मोहीम सुरू

पिंपरी-चिंचवड शहरात राडारोडा आणि कचरा साचतो, अशी जवळपास ७०० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी पालिकेच्या तीन विभागांच्या वतीने संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे. याचे श्रेय घेत सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची पाठ थोपटण्यास सुरुवात केली असतानाच, या मोहिमेची जबाबदारी नेमकी कोणाची, यावरून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवल्याने या मोहिमेचे काय होणार, हे आतापासून दिसू लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या उपस्थितीत बैठक झाली, तेव्हा स्वच्छतेच्या मुद्दय़ावर संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले होते. त्यानंतर, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या विषयात लक्ष घातले. त्यानुसार, आरोग्य, स्थापत्य आणि आठ क्षेत्रीय कार्यालये यांनी एकत्र मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने शहरात राडारोडा होणारी तसेच कचऱ्याचे ढीग असणारी जवळपास ७०० ठिकाणे निश्चित करण्यात आली. या सर्व ठिकाणी नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. पालिकेचा स्थापत्य विभाग, आरोग्य विभाग आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गणेश विसर्जनानंतर या मोहिमेचे काम सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी भोसरीतील आशीर्वाद गॅस एजन्सी शेजारी तसेच पिंपळे गुरव रस्त्यावर पडलेला राडारोडा उचलण्यात आला.

आमदारांनी झाडाझडती घेतल्याने ही मोहीम सुरू झाल्याचे सांगत भाजपने याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शहर अभियंता अंबादास चव्हाण आणि सहआयुक्त दिलीप गावडे यांच्यात याविषयी एकवाक्यता नसल्याचे दिसून आले आहे. या मोहिमेचा तसा आपला थेट संबंध नाही. आमचा विभाग केवळ सहकार्य करणार आहे. त्यादृष्टीने स्थापत्य विभागाचे अभियंते कामाला लावले आहेत, असे अंबादास चव्हाण यांनी म्हटले आहे. या मोहिमेचे दिलीप गावडे हेच ‘इनचार्ज’ आहेत, असेही शहर अभियंत्यांनी स्पष्ट केले. तथापि, गावडे यांना हा युक्तिवाद मान्य नाही. स्वच्छ भारत मोहीम आपल्याकडे आहे, मात्र या मोहिमेचा विषय आपल्याकडे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा विषय आरोग्य विभागाचा आहे, असेच अधोरेखित करण्यात आले.

पालिका अधिकाऱ्यांमध्ये अशा प्रकारे चालढकल दिसून येत असल्याने नेमकी जबाबदारी कोणाची, असा मुद्दा उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

Story img Loader