िपपरी महापालिकेच्या वतीने पुनवळ्यातील ५५ एकर जागेत कचरा डेपोची उभारणी करण्यात येणार आहे. मात्र, तेथे जागा घेतलेले काही बांधकाम व्यावसायिक आणि पालिकेतील सत्ताधारी नेत्यांच्या संगनमताने हा प्रस्ताव जाणीवपूर्वक रखडवण्यात येत आहे, असा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. मोशीसाठी कचरा डेपो आणि शहराच्या मध्ववर्ती भागासाठी २४ तास पाणीपुरवठा, असा भेदभाव का, असा मुद्दा शिवसेनेचे नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी उपस्थित केला.
स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनीस सव्वाचार कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला, या विषयावरून सदस्यांनी, केवळ शहरी तोंडवळा असलेल्या भागात २४ तास पाणी न देता ग्रामीण भागाचाही त्या योजनेत समावेश करावा, अशी मागणी केली. ग्रामीण भागात किमान तीन तास पाणी मिळावे, अशी अपेक्षा शांताराम भालेकर यांनी व्यक्त केली. अतुल शितोळे यांनी, या योजनेची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील, असे सांगितले. एलबीटी बंद झाल्याने उत्पन्नवाढीचा विचार व्हायला हवा. त्यासाठी आपल्याकडे नामी उपाय आहे. अजितदादांशी चर्चा केल्यानंतर त्याची घोषणा करू, असे ते म्हणाले. पालिका प्रशासन एकीकडे उत्पन्न वाढवण्याच्या गोष्टी करते, दुसरीकडे जाहिरात फलकांची दरवाढ केली जात नाही, भाडय़ाने दिलेल्या इमारतींचे दर वाढवले जात नाहीत, अनधिकृत बांधकामांचे सव्‍‌र्हेक्षण झाले, त्याच्या नोंदी होत नाहीत, याकडे आल्हाट यांनी लक्ष वेधले. पुनवळ्यात कचरा डेपो न होण्यामागे अर्थकारण आहे, असे सांगत त्या ठिकाणी नियोजित कचरा डेपो सुरू करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा आल्हाटांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा