नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते. नागरिकांच्या या समस्यांना प्रातिनिधिक व्यासपीठ देऊन त्यांचे गाऱ्हाणे या व्यासपीठावर मांडणारा ‘लोकसत्ता’चा हा पुढाकार…
पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विस्तारत आहेत. चारही बाजूंनी गगनचुंबी इमारती उभारत असून, लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातून जुना पुणे-मुंबई महामार्ग जातो. देहूरोड, तळेगाव दाभाडे या भागातूनही हा महामार्ग जातो. महापालिका, तळेगाव नगर परिषद ओला आणि सुका कचरा वेगळा स्वीकारते. एकत्रित कचरा घेतला जात नाही. अनेक नागरिक कचरा एकत्रितच ठेवतात. घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कचरा स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हा कचरा महामार्गाच्या कडेला टाकला जातो.
हेही वाचा – पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी दोन ‘दादां’चे नाव आघाडीवर
नेमकी समस्या काय?
महापालिका, नगर परिषदेने कचराकुंडीमुक्तीसाठी शहरातील कचराकुंड्या हटविल्या आहेत. कचराकुंड्या नसल्याने रात्रीच्या अंधारात लोक महामार्गाच्या कडेला कचरा टाकतात. तळेगाव दाभाडे भागातील रहिवासी मोठ्या संख्येने नोकरीसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात येतात. त्यांच्याकडून महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी कचरा टाकला जातो. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला तळेगाव दाभाडे ते देहूरोडपर्यंत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. महामार्गावरील प्रवाशांना त्याची दुर्गंधी सहन करावी लागते. तळेगाव दाभाडे-चाकण महामार्गाच्या बाजूंनीही असाच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे महामार्ग आहे की कचरा मार्ग असा सवाल उपस्थित होत आहे.
खडकी, देहूरोड हद्दीतील कचरा शहरात
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याची समस्याही वाढत आहे. शहरात सात वर्षांपूर्वी ओला आणि सुका असा ८३२ टन दैनंदिन कचरा संकलित होत होता. तोच आता १२८० टनांवर गेला असल्याने मोशीतील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर उभारला आहे. खडकी आणि देहूरोड कटक मंडळाच्या हद्दीतील कचऱ्याचा भारही महापालिकेवर पडत आहे. तेथील कचरा मोशीतील डेपोत टाकला जात आहे.
रहिवाशांचे म्हणणे काय?
तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून एकत्रित कचरा स्वीकारला जात नाही. अनेक कुटुंबांतील दोन्ही सदस्य नोकरी करतात. कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीच्या वेळी घरी कोणीही नसते. त्यामुळे कामावर जाताना कचरा महामार्गाच्या बाजूला टाकला जातो. हा कचरा कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडून उचलला जात नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरते. महापालिका आणि नगर परिषद प्रशासनाने महामार्गावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक नेमण्याची आवश्यकता आहे. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे, असे नारायण पडघन म्हणाले.
हेही वाचा – कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोप निश्चित करण्यासाठी अर्ज
प्रशासनाचे म्हणणे काय?
शहरात घंटागाडीमार्फत घरोघरचा ओला आणि सुका असा स्वतंत्र कचरा संकलित केला जात आहे. महापालिका हद्दीबाहेरील लोकांकडून महामार्गाच्या कडेला कचरा टाकला जातो, असे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले.