नागरिकांकडून ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण कामगारांकडून करून घेणे बेकायदेशीर, अमानवी आणि माणसाच्या सन्मानालाच पायदळी तुडवणारे आहे, असे मत पुणे महापालिका कर्मचारी युनियनच्या सचिव मुक्ता मनोहर यांनी व्यक्त केले असून विभक्त न केलेला कचरा आता नक्कीच उचलणार नाही, असा निर्धारच सेवकांनी केला असल्याचे म्हटले आहे.
स्वतला नको असलेल्या सर्व गोष्टी म्हणजे शरीराला नको असलेली घाण, वस्तूंसाठी नको असलेली वेष्टणं, कापडाचे बोळे, नको असलेले कागद, काचा, पत्रे-खिळे, खराब झाल्यामुळे नको असलेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या, नको असलेले नासलेले शिळे अन्न, अशा असंख्य नको असलेल्या गोष्टी.. त्या फेकणाऱ्याला त्या गोष्टींपासून मुक्तता हवी असते. ते टाकून देण्यासाठी दोन पावलं चालायचा त्रासही त्याला नकोच असतो. या सगळ्याची जबाबदारी अर्थातच सरकारने घ्यावी, म्हणजेच महापालिकेने घ्यावी अशी त्याची अपेक्षा असते.
मुक्ता मनोहर यांनी या संदर्भात एक घटना सांगितली.. काही महिन्यांपूर्वीची ही गोष्ट. येरवडा येथील एका झोपडपट्टीतला कचऱ्याचा कंटेनर स्वच्छ आवरून झाला होता. तिथे रिकामा कंटेनर आणूनही ठेवलेला होता. एक सेवक फक्त कंटेनरच्या भोवतालचे झाडून झाल्यावर तिथून जाण्याच्याच तयारीत होता, तेवढय़ात एका इसमाने कुजलेली घाण त्या जागेवर आणून भिरकावली. ‘निदान ती घाण कंटेनरमध्ये तरी टाक,’ असे तो सेवक म्हणाला. त्यावर त्या इसमाचा प्रचंडच भडका उडाला. त्याने कमरेचा पट्टा काढून त्या सेवकाला मारले आणि घाण तशीच टाकून तिथून चालता झाला. त्या गुंडवृत्तीच्या इसमाविरोधात पोलीस तक्रार करताना तक्रार देणाऱ्या सेवकाला प्रचंड भीतीने ग्रासले होते.
स्थानिक लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते तर बऱ्याचदा आरोग्य कोठी मधले मनपाचे सेवक म्हणजे आपल्याच हाताखालचे नोकर आहेत या भावनेने त्यांच्याशी वागतात. असे मत व्यक्त करून त्या म्हणाल्या, की कचरा टाकणाऱ्याला घाण, वेष्टणे, कापडाचे बोळे, काचा, पत्रे-खिळे, प्लॅस्टीकच्या पिशव्या, नासलेले अन्न, अशा असंख्य गोष्टींपासून मुक्तता हवी असते. ते टाकून देण्यासाठी दोन पावले चालायचा त्रासही त्याला नकोच असतो. कहर म्हणजे वैद्यकीय कचरासुद्धा कंटेनरमध्ये टाकला जातो. काही सेवकांच्या हाताला इंजेक्शनच्या सुया लागल्या आहेत. काहींचे हात कचऱ्यातील घाणेरडय़ा रक्ताने माखले आहेत. स्त्रियांच्या मासिक पाळीचे पॅड्सही या कचऱ्याचा हिस्सा असतात. या कचऱ्यामुळे अनेक सेवकांना जेवण करणेही अशक्य होते. काहींच्या शरीरावर रॅश उठले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा