शहरातील कचऱ्याचा प्रश्न चिघळलेला असताना कचऱ्याची विल्हेवाट
मध्य शहरापासून अंतरावर असलेल्या भागात आणि शहराच्या हद्दीलगत कचऱ्याच्या प्रश्नाची तीव्रता खूपच जास्त आहे. सिंहगड रस्त्यावर वडगाव, धायरी, वारजे, आंबेगाव, नऱ्हे, कात्रज, धनकवडी, कोंढवा, हडपसर अशा बहुतांश भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिक रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यात ओला-सुका अशी विभागणी केलेली नसते. प्लास्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे तो त्यातच कुजतो, सडतो आणि तेथेच साचून राहतो. त्याचे प्रमाण इतके जास्त आहे की, दिवसभरातच ढीग साचतात. हा कचरा रोज उचलला जात नाही. काही ठिकाणी तर तो कधीच उचलला जात नाही. तो रस्त्यावर ओसंडू लागला की, रस्त्यावरील कचरा रस्त्याच्या कडेला सारला जातो. आणि कडेचा कचरा रस्त्याच्या खाली ढकलला जातो. बाजूला नाला, ओढा, चर असेल तर कचरा त्यात टाकला जातो. तो तेथेच साचून राहतो. तेथेच तो कुजतो आणि परिसरात दरुगधी पसरते. अतिशय कुबट, सडलेल्या पदार्थाचा वास त्या भागातून जाणाऱ्या प्रवाशांनाही त्रासदायक ठरतो. तेथे राहणाऱ्यांसाठी तर तो कायमचा मनस्ताप ठरत आहे. अशी ठिकाणे जागोजागी आहेत. साताऱ्याकडे जाणाऱ्या बाहेरच्या महामार्गालगत नऱ्हे, वडगाव पुलाजवळ त्याची उदाहरण आहेत.
या कचऱ्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या कचऱ्यावर वावरणारी भटकी कुत्री, डुकरे, वेगवेगळे पक्षी यांच्यामुळे परिसरात घाण आणि संसर्ग पसरत आहेच. त्याचबरोबर हा कचरा डासांसारखे कीटक, चिलटे, माशा यांच्या उत्पत्तीसाठी पूरक ठरला आहे. त्यामुळे या भागाला आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या भागातील नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. चुकून कधीतरी कचरा उचलला जातो. बहुतांश वेळा तो इकडे तिकडे जमा केला जातो, अशी तक्रारी या भागातील नागरिकांनी बोलून दाखवल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा