उरुळी येथील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाचा तसेच सत्ताधाऱ्यांचा निषेध विरोधी पक्षांनी केला आहे. या प्रश्नी भारतीय जनता पक्षातर्फे गुरुवारी महापालिकेत आंदोलन करण्यात आले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
उरुळी येथील कचऱ्याचा प्रश्न येत्या आठ दिवसांत तरी सुटण्याची चिन्ह नाहीत. त्यामुळे शहरातील संपूर्ण कचरा उचलणे येत्या काही दिवसांत शक्य होणार नसल्याचे दिसत आहे. शहरातील कचरा साठून राहत असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शहर भाजपतर्फे गुरुवारी महापालिका भवनात आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष अनिल शिरोळे, प्रदेश चिटणीस प्रा. मेधा कुलकर्णी, सरचिटणीस संदीप खर्डेकर, राजेश पांडे, गटनेता अशोक येनपुरे, तसेच गणेश घोष आणि पक्षाचे नगरसेक व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. कार्यकर्ते या वेळी कचराही घेऊन आले होते. आयुक्त कार्यालयात जोरदार घोषणा दिल्यानंतर आयुक्तांच्या कार्यालयात तसेच त्यांच्यासमोर हा कचरा ओतण्यात आला.
कचऱ्याचा प्रश्न गेली काही वर्षे सातत्याने भेडसावत असूनही प्रशासनातर्फे ठोस उपाययोजना केली जात नाही. या प्रश्नाची सोडवणूक गांभीर्याने करणे आवश्यक आहे. तसेच सध्या निर्माण झालेल्या प्रश्नाकडे तातडीने पावले उचलणे आवश्यक असताना सत्ताधारी सुडाच्या राजकारणाला साथ देत आहेत. हा प्रश्न तातडीने न सुटल्यास शहरभर आंदोलन केले जाईल, असे निवेदन या वेळी आयुक्तांना देण्यात आले.
मनसेचा आज मोर्चा
कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याऐवजी प्रशासन व सत्ताधारी फक्त चर्चामध्येच गुंतले असून शहरात जिकडे तिकडे कचरा पसरला आहे. त्यामुळे पुणेकर त्रस्त असून सध्या कचरा उचलला जात नसल्याचा निषेध करण्यासाठी मनसेतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनसेचे गटनेता वसंत मोरे यांनी गुरुवारी सांगितले. मनसेतर्फे शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता हा मोर्चा काढला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
नागरिकांनीही साथ द्यावी
गेले काही दिवस कचऱ्याचा जो प्रश्न शहरात निर्माण झाला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. पुणेकर नागरिक व नगरसेवक या दोन्ही घटकांच्या मदतीशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही. सद्यपरिस्थितीत प्रत्येक कुटुंबात जागेवरच कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण झाले, तर प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्या दृष्टीने पुणेकरांनी स्वयंस्फूर्तीने सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी केले आहे. सध्या जे कचऱ्याचे ढीग सर्वत्र साठले आहेत तो कचरा सडू नये यासाठी साठलेल्या कचऱ्यावर आवश्यक सोल्यूशन फवारण्याची तयारी महाराष्ट्र वूमेन्स डेव्हलपमेंट को-ऑप. क्रेडिट सोसायटीज को-ऑप. फेडरेशनच्या वतीने दर्शवण्यात आली असून तसे पत्रही भोसले यांनी संस्थेच्या वतीने गुरुवारी आयुक्तांना दिले.
कचऱ्याचा प्रश्न आता राजकीय पक्षांच्या हाती
उरुळी येथील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाचा तसेच सत्ताधाऱ्यांचा निषेध विरोधी पक्षांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-02-2014 at 03:08 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage problem political party agitation