उरुळी येथील हंजर कंपनीच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला लागलेल्या आगीनंतर तेथे दर दिवशी सहाशे टन कचऱ्यावरच प्रक्रिया सध्या होत आहे. त्यामुळे त्याहून अधिक कचरा प्रकल्पात देणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्यामुळे शहरातील कचरा उचलण्याची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी, शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे कंटेनर जागेवर उभे असून त्यातून कचरा वाहू लागला आहे. ग्रामस्थांकडून अनेक कचरा गाडय़ा सध्या परत पाठवल्या जात आहेत.
ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी महापौर चंचला कोद्रे, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, घनकचरा विभागाचे प्रमुख, उपायुक्त सुरेश जगताप बुधवारी उरुळी येथे गेले होते. कचरा डेपोच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत १ वा २ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून बैठकीत निश्चित तोडगा निघेल. तोवर आंदोलन करू नका, अशी विनंती विशाल तांबे यांनी ग्रामस्थांना केली. तसेच ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनेही यावेळी चर्चा झाली.
उरुळी येथील हंजर कंपनीच्या प्रकल्पाला १८ जानेवारी रोजी लागलेल्या आगीत तेथील यंत्रसामग्री जळाली. त्यामुळे तेथे सध्या सहाशे टन कचऱ्यावरच प्रक्रिया होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकत नसल्यामुळे तो कचरा डेपोच्या परिसरात वा अन्यत्र टाकू देणार नाही, असा ग्रामस्थांचा पवित्रा आहे. त्यानुसार आंदोलन सुरू करण्यात आले असून हंजर प्रकल्पात सहाशे टनांच्या वर येणारा कचरा सध्या परत पाठवला जात आहे. परिणामी, कचरा गोळा करण्याचे तसेच कंटेनर उचलण्याचे काम मंदावले असून शहरात जागोजागी कचरा साठून राहिला आहे. अनेक कंटेनर गेल्या दोन-तीन दिवसात उचलले गेलेले नाहीत. त्यामुळे त्यात मोठय़ा प्रमाणात कचरा साठला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा