महाराष्ट्रातल्या अनेक छोटय़ा-मोठय़ा शहरांमध्ये या गटाच्या छत्राखाली त्याच नावाचे स्थानिक बागकाम करणाऱ्यांचे गट सुरु करण्यात आले आहेत. त्यांचं महिन्यातून एकदा संमेलन होतं आणि तेव्हा गच्चीवरची बाग आणि तिच्याशी संबंधित समस्यांवर उपाय शोधले जातात.

बागकाम हा अनेकांचा आवडीचा प्रांत असतो. ओला कचरा घरच्या घरी जिरवण्याच्या उद्देशाने अनेक जण आजकाल नव्याने बागकामाकडे वळत आहेत. मात्र कुठलीही गोष्ट नव्याने करायची म्हटली की अडचणींचा डोंगर ठरलेलाच. नव्याने बागकाम करताना आलेल्या अडचणींवर उपाय शोधण्यासाठी प्रमोद आणि अनिता तांबे यांनी फेसबुकवरच्या समूहांची मदत घेतली.  त्यानंतर मराठीतून बागकामाविषयीच्या शंकांचं निरसन करता यावं या हेतूने त्यांनी ‘गच्चीवरील मातीविरहित बाग’ या फेसबुक गटाचं रोपटं लावलं आणि आज या गटाचं रुपांतर अक्षरश वटवृक्षामध्ये झालंय.

प्रमोद तांबे सांगतात,‘ आपल्या घरातला ओला कचरा जिरवायचा कसा हा अनेकांना पडणारा प्रश्न आम्हालाही पडला होता. अशातच माझ्या भाचीने तिच्या फ्लॅटच्या गच्चीवर ओल्या कचऱ्याच्या वापरातून तयार केलेलं खत वापरुन फुलवलेली बाग आम्ही पाहिली आणि आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आपणही आपल्या घराच्या गच्चीवर अशीच बाग फुलवायची असं ठरवून आम्ही कामाला लागलो. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात आमची बाग फुलत जाऊन बागेतल्या कुंडय़ांची संख्या ६० च्या घरात पोहोचली. आम्ही फुलझाडं, फळझाडं आणि भाजीपाला पिकवायला लागलो. पण पावसाळ्यात आमच्या बागेत गोगलगाई दिसायला लागल्या, कुंडय़ांमध्ये पांढऱ्या जाड अळ्याही झाल्या. तेव्हा यावर उपाय शोधण्यासाठी अशा ऑरगॅनिक बागायतदारांचे बंगळुरु, चेन्नई इथले गट मला सापडले. तिथे मला सल्ला मिळाला, पण तो इंग्रजीत. मग माझ्या मनात आलं, फेसबुकवर आपणही असाच एखादा बागप्रेमींचा गट मराठीतून सुरू करावा. २००८ मध्ये ‘गच्चीवरील मातीविरहित बाग’ हा गट फेसबुकवर सुरु केला, आज या गटाचे सदस्य लाखाच्या घरात पोहोचलेत.’

अनिता तांबे म्हणाल्या, ‘गटातील सदस्यांपैकी जवळपास १०,००० जणांनी या पेजवरून मिळालेल्या माहितीतून स्फूर्ती घेऊन आपापल्या घरचा ओला कचरा घरातच जिरवायला सुरवात केलीये. ओल्या कचऱ्यावर जैविक प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणारे आणि ते खत वापरुन गच्चीवर फुलवलेल्या बागेतील छायाचित्र आणि अनुभव अनेक जण इतरांसाठी सांगतात, तेव्हा खरंच खूप आनंद होतो.’

महाराष्ट्रातल्या अनेक छोटय़ा-मोठय़ा शहरांमध्ये या गटाच्या छत्राखाली त्याच नावाचे स्थानिक बागकाम करणाऱ्यांचे गट सुरु करण्यात आले आहेत. त्यांचं महिन्यातून एकदा संमेलन होतं आणि तेव्हा गच्चीवरची बाग आणि तिच्याशी संबंधित समस्यांवर उपाय शोधले जातात. नुकतंच आम्ही आमच्या या गटाचं ‘यूटय़ूब’ वर एक अधिकृत चॅनेलही लाँच केलंय. या चॅनेलवरसुद्धा बागेसंदर्भातली प्रश्नोत्तरं आणि शंकानिरसनाचे व्हिडिओज आम्ही अपलोड करतो, अशीही माहिती तांबे यांनी दिली.

प्रमोद तांबे सांगतात, सोशल नेटवर्कवर फेसबुक पेजवरुन २००८ मध्ये चालू करण्यात आलेली ही विकेंद्रित घनकचरा व्यवस्थापनाची चळवळ पुढे नेण्यासाठी  आम्ही आमचा हा फेसबुकवरचा समूह यंदाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सामाजिक कार्य करणारी संस्था (एनजीओ) म्हणून नोंदणी करून घेतला आहे. त्याचे एक बोधचिन्हही बनवण्यात आले आहे. या संस्थेच्या माध्यमातून यापुढेही समाज प्रबोधनाची चळवळ पुढे नेण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये महानगरांमधल्या विविध शाळांमध्ये आठवडय़ातून काही ठरावीक दिवस आमच्या संस्थेचे कार्यकर्ते जाणार आहेत. शाळकरी मुलांना घन कचऱ्याची समस्या म्हणजे नेमकं काय, ती कशी सोडवता येईल, त्यासाठी घनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं, ओल्या कचऱ्याचं कंपोस्टिंग कसं करावं, गांडूळखत निर्मिती, कचऱ्यातून नंदनवन कसं फुलवावं यावर मार्गदर्शन करणार आहेत. चित्रफिती दाखवून प्रबोधन, प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ दाखवणं अशा विविध प्रकारांतून मुलांवर लहान वयात स्वच्छ भारत व कचरामुक्तीची बीजं रुजवण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला जाणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये बैठका घेऊन हेच काम करण्याची, तिथल्या रहिवाशांना स्फूर्ती देण्यासाठीही प्रयत्न करण्याचा संस्थेचा मानस आहे. कचऱ्याच्या समस्येनं धुमसणाऱ्या शहरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. कचऱ्याचा हा भस्मासुर आवरायचा कसा यावर बोललं बरंच जातं, पण त्याला कृतीची जोड अभावानेच दिली जाते. प्रमोद आणि अनिता तांबे यांच्या पुढाकारानं सुरु झालेल्या या गटाचे सदस्य आपणही झालो तर कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठीचा आपला खारीचा वाटा आपण नक्की उचलू शकू!

प्रमोद आणि अनिता तांबे यांच्याशी (०२०) २४४७ ४७८३, मोबाइल – ८४४६३ ५३८०५  या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

भक्ती बिसुरे bhakti.bisure@expressindia.com

 

 

 

 

Story img Loader