मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली निर्गमन मार्गिकेजवळ गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर जाऊन उलटला. त्या वेळी समोरुन येणारी मोटार टँकरवर आदळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) सकाळी घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सागर जनार्दन देशपांडे (रा. सेक्टर क्रमांक २१, प्राधिकरण निगडी), योगेश धर्मदेव सिंग (रा. पार्श्वनाथ प्रतिष्ठान, शिवतेजनगर, चिखली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात आणखी एकाचा मृत्यू झाला असून त्याचे नाव, पत्ता अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जात असलेल्या गॅस टँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर उलटला. त्या वेळी समोरून येणारी मोटार टँकरवर आदळली.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीचे पथक, देवदूत पथक, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवान, ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ या संस्थेतील स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मोटारीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.


सुदैवाने वायू गळती टळली –

उलटलेल्या टँकरमध्ये प्राॅपलिन वायू होता. रासायनिक तज्ज्ञ धनंजय गिध यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अग्निशमन दलाचा बंब आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. खोपाेली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि कर्मचाऱ्यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्यानंतर गळती झाली नाही. त्यामुळे गंभीर दुर्घटना टळली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas tanker overturns on mumbai pune expressway msr