सामिष खवय्यांच्या आवडत्या आखाड महिन्याची सांगता गुरूवारी (२८ जुलै) होणार आहे. गुरूवारी सामिष खादपदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते. त्यामुळे खवय्यांनी आदल्या दिवशी आखाडाची सांगता केली. हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारुन खवय्यांनी गटारी अमावस्या साजरी केली.

सामिष खवय्ये दीप अमावस्येला गटारी अमावस्या असे संबोधितात. अमावस्येचा प्रारंभ बुधवारी (२७ जुलै) रात्री झाला. गुरूवारी रात्री अमावस्येची सांगता होणार आहे. गुरूवारी सामिष खाद्यपदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जात असल्याने बुधवारी सकाळपासून मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. गणेश पेटेतील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. कसबा पेठ, भवानी पेठ, कर्वे रस्ता तसेच लष्कर परिसरातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात मटण खरेदीसाठी खवय्यांनी रांगा लावल्या होत्या. पुुणे-सातारा रस्त्यावरील पद्ममावती, पौड रस्ता, विश्रांतवाडीतील मासळी बाजारात गर्दी झाली होती. घरगुती ग्राहक तसेच हाॅटेल व्यावसायिकांकडून मटणाला चांगली मागणी राहिली. पुणे, पिंपरी परिसरातील बाजारात अमावस्येनिमित्त अडीच हजार बकऱ्यांची आवक झाली, असे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. चिकनला मागणी चांगली राहिली. चिकनची आवकही चांगली झाली. पुणे, पिंपरी शहरात बुधवारी हजारो किलो चिकनची विक्री झाली, असे पुणे बाॅयलर असोसिशएनचे संचालक रुपेश परदेशी यांनी नमूद केले.

गणेश पेठेेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी १० ते १२ टन, आंध्रप्रदेशमधून रहू, कतला, सीलन मासळीची २० टन, नदीतील मासळी ७०० किलो, खाडीतील मासळी ५०० किलो अशी आवक झाली. हाॅटेल, खानावळ तसेच घरगुती ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याचे मासळी बाजारातील प्रमुख व्यापारी रुपेश परदेशी यांनी सांगितले. पापलेट, सुरमई, रावस, हलवा, कोळंबी, वाम या मासळींना चांगली मागणी होती, असे त्यांनी सांगितले.


चिकन, मटण, मासळीचे दर

मटण- ६८० ते ७०० रुपये किलो

चिकन- २०० रुपये किलो

पापलेट- ८०० ते दोन हजार रुपये किलो

हलवा- ७०० ते एक हजार रुपये किलो

कोळंबी- १८० ते १४०० रुपये किलो

वाम- ४०० ते ८०० रुपये किलो

रावस- ७०० ते १२०० रुपये किलो

Story img Loader