पुणे : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचं प्रसुतीदरम्यान निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने १० लाख रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले. त्यावेळी भिसे कुटुंबियांकडे एवढी रक्कम भरण्यास नव्हती. त्यामुळे तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात जावं लागलं आणि तिथे तनिषा भिसे यांची प्रसुती झाली.
तनिषा भिसे यांनी जुळ्या मुलींना जन्मही दिला. पण प्रसुतीनंतर तनिषा भिसे यांचं काही वेळात निधन झाल्याची घटना घडली. पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून पैशांसाठी अडवणूक केली नसती, तर तनिषा भिसे यांच्यावर वेळेत उपचार झाले असते आणि त्यांचा जीव वाचला असता, असे आरोप भिसे कुटुंबियांकडून केला जात आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तर भिसे कुटुंबीयांना १० लाख रुपये भरण्यास सांगणारे डॉ. सुश्रुत घैसास यांनी रुग्णालयाच्या मानद प्रसुतीपदाचा काल राजीनामा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील ८५० रुग्णालयांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
आपत्कालीन प्रकरणात संबधित रुग्णांच्या कुटुंबियांकडून डिपॉझिट घेऊ नये, उपचार दिल्यानंतर इतर गोष्टींबाबत कुटुंबियांसोबत चर्चा करा, रुग्णालयात आलेल्या रुग्णांना प्राधान्याने उपचार दिले पाहिजे. जर कोणत्याही रुग्णालयाने डिपॉझिटची मागणी केल्यास त्या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी माहिती दिली. तर गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर पुणे शहरातील अनेक संघटनांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलने केली होती. रुग्णालय परीसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पुणे पोलिसांनी एक नियमावली केली आहे.
पुणे पोलिसांनी आदेशात नेमके काय म्हटलं आहे पाहुया
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसर आणि त्याच्या सभोवतालच्या १०० मीटरपर्यंतच्या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय दोन किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर रुग्ण, रुग्णवाहिका चालक, रुग्णालयातील कर्मचारी, सुरक्षा अधिकारी या व्यक्तींना हा आदेश लागू होणार नाही. रुग्णालय परीसरात ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच रुग्णालय परीसरात वाद निर्माण होईल असा मजकूर लिहिण्यास आणि छापील मजकूर चिकटवण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश ९/४/२०२५ ते १९/४/२०२५ पर्यंत लागू असणार असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले.