गौरव आहुजा नावाच्या एका तरुणाने भर चौकात लघुशंका केल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील अहोरात्र गजबलेल्या शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध आलिशान मोटार थांबवून आहुजाने हे लज्जास्पद कृत्य केले. याबाबतची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहुजासोबत त्याचा मित्र होता. एका नागरिकाने त्यांना या कृत्याबद्दल जाब विचारला, तेव्हा आहुजा आणि त्याचा मित्र मोटारीतून पसार झाले. सांस्कृतिक नगरी, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात अशा प्रकारच्या घटना अलीकडे वाढीस लागल्या आहेत. आपल्याला कुणी काही करू शकणार नाही, अशा बेदरकार वृत्तीतून या घटना घडतात. पण, यामुळे शहराची शांतता धोक्यात येते आणि लौकिकालाही बट्टा लागतो.

भर रस्त्यात मद्यप्राशन करून शिवीगाळ करणे, वाहने भरधाव चालविणे, रात्री-अपरात्री आरडाओरडा, तसेच रस्त्यात अश्लील चाळे करणे असे प्रकार हल्ली अनेकदा घडतात. बहुतेकदा ते समोर येत नाहीत, कारण याबाबत कोणी तक्रार करत नाही. पण, या घटनांचा नागरिकांना त्रास होतो. शहराचे आता महानगरात रूपांतर झाले आहे. नोकरी-व्यवसाय, तसेच शिक्षणानिमित्त वेगवेगळ्या प्रांतांतून लोक पुण्यात वास्तव्यास आले आहेत. पुण्यातील सांस्कृतिक वातावरण, सुरक्षितता हेही पुण्यात वास्तव्याचे एक आकर्षण होते, आहे. मात्र, अशा घटनांमुळे त्यावर प्रश्नचिन्हे उभी राहू लागली आहेत. गेल्या काही वर्षांत कोरेगाव पार्क, कल्याणीनगर एबीसी फार्म रस्ता, हायस्ट्रीट, एनआयबीएम रस्ता आदी भागांत उभ्या राहिलेल्या पब, रेस्टॉरंट आणि हॉटेल्समुळे मुंबईप्रमाणेच पुण्यातही रात्रजीवन हा शहरी जगण्याचा अविभाज्य भाग झाला. मात्र, नियम धाब्यावर बसवून वेळेची मर्यादा न पाळता सुरू असलेले पब, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स आणि त्यातून बाहेर पडून गोंधळ घालणारे काही जण, यांचा अंतिमत: नागरिकांनाच त्रास होतो आहे.

तरुणाने लघुशंका करण्याचा प्रकार ज्या शास्त्रीनगर चौकात घडला, त्यापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर कल्याणीनगर परिसर आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात भरधाव आलिशान मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना याच कल्याणीनगरमध्ये घडली होती. मोटारचालक अल्पवयीन होता आणि तोही असाच पार्टी करून मद्याच्या अमलाखाली गाडी चालवत होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली. या घटनेतील मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी रक्तनमुने बदलण्यापासून केलेले अनेक ‘प्रताप’ही नंतर उघडकीस आले. शास्त्रीनगर चौकात घडलेल्या घटनेतील तरुणही नागरिकांनी हटकल्यानंतर पसार झाला होता. कोल्हापूर येथे मोटार लावून तेथून भाडेतत्त्वावर मोटार घेऊन तो कर्नाटकात निघाला होता. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळताच तो माघारी फिरला आणि सातारा जिल्ह्यातील कराड पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आहुजाविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात खंडणी, जिवे मारण्याची धमकी, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत.

कल्याणीनगर अपघात प्रकरण असो, वा शास्त्रीनगर चौकातील गेल्या आठवड्यातील घटना, ही एक प्रवृत्ती आहे. रात्री-अपरात्री रस्त्यांवरून आरडाओरडा करत फिरणे, रस्त्याच्या मधोमध रात्री १२ वाजता वाढदिवस साजरे करून फटाके उडविणे, तलवार, कोयत्याने केक कापणे, फटाक्यासारखा आवाज काढणारे सायलेन्सर बसवून अपरात्री फिरणे, मद्याच्या नशेत वाहन चालविणे, रस्त्यात अश्लील चाळे करणे असे प्रकार या शहरात आता सर्रास सुरू आहेत, ते याच वृत्तीचे दर्शन आहे. रात्रजीवन हे महानगरांचे अविभाज्य अंग बनत असले, तरी त्यातून इतर नागरिकांना त्रास देणे हे काही स्वीकारार्ह नाही. असा त्रास देणाऱ्यांवर जरब बसेल, अशीच कारवाई हवी. आहुजा प्रकरणानंतर ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आली आहे.

rahul.khaladkar@expressindia.com

Story img Loader