प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गौतमी पाटील तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेत असल्याचं वक्तव्य केलं. तसेच आम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम करून आम्हाला संरक्षण नाही आणि तिला संरक्षण असं म्हटलं. यानंतर आता गौतमी पाटीलने इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ती बुधवारी (५ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होती.
गौतमी पाटील म्हणाली, “मी याबाबत बोलण्यासाठी फारच लहान आहे. माझ्या कार्यक्रमाच्या आयोजकांना माझं मानधन किती आहे हे माहिती आहे. ३-४ गाण्यांसाठी ३ लाख रुपये हे जास्तच आहेत. कसं होणार, असं असेल तर लोक मला बोलावणार नाहीत.”
“आम्ही प्रबोधनाचं काम करून आम्हाला संरक्षण नाही पण तुम्हाला संरक्षण असतं या इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर गौतमी म्हणाली, “हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. त्यामुळेच प्रेक्षक कार्यक्रमाला येतात, कार्यक्रम बघतात, आनंद घेतात. म्हणून गर्दी होते. तेवढं तर पाहिजेच ना. एवढी गर्दी होत असेल, तर साहजिक आहे की, मी काही संरक्षण मागणारच,” असं मत गौतमी पाटीलने व्यक्त केलं.
“तुमच्या कार्यक्रमातून किती लोकांचे संसार चालतात?”
“तुमच्या कार्यक्रमातून किती लोकांचे संसार चालतात?” या प्रश्नावर गौतमी पाटील म्हणाली, “आम्ही एकूण ११ मुली आहोत. इतर कलाकार मिळून आम्ही २० लोक असू. त्या सर्वांचा संसार मी चालवते असं मी म्हणून शकत नाही. मात्र, आम्ही एवढे लोक मिळून एकत्र काम करतो. आम्ही आत्ता प्रसिद्ध झालो, मात्र, आम्ही बऱ्याच वर्षांपासून एकत्र काम करतो.”
हेही वाचा : “तिला तीन गाण्यांसाठी काही लाख अन् आम्हाला टाळ वाजवून…” इंदुरीकर महाराजांची गौतमी पाटीलवर अप्रत्यक्ष टीका
“मी आज जे उभी आहे ते प्रेक्षकांमुळे आहे. संपूर्ण महाराष्ट्राने मला प्रेम दिलं. मला त्यांनी काहीही जाणवू दिलं नाही. मी त्यांच्यामुळेच परत उभी आहे,” असंही गौतमीने नमूद केलं.
इंदुरीकर महाराज काय म्हणाले होते?
“आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षणही दिलं जात नाही,” असं इंदुरीकर महाराज या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.