पुणे : ॲपवरुन झालेल्या ओळखीतून लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पिंपरीतील एका तरुणाला संगम पूल परिसरात बोलावून चौघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्याच्याकडील रोकड लुटून पसार झालेल्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, शाहरुख टाॅप नावाचा आरोपी, तसेच त्याच्याबरोबर असलेल्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण पिंपरी परिसरात राहायला आहे. आरोपींची त्याची एका ‘गे ॲप’वरुन ओळख झाली होती. आरोपींनी १८ मार्च रोजी त्यांना मंगळवार पेठेतील आरटीओ चौकात भेटण्यासाठी बोलाविले. त्यानंतर रेल्वे रुळालगत असलेल्या मोकळ्या जागेत त्याला नेण्यात आले. आरोपींनी तरुणाला धमकावून पैशांची मागणी केली. आरोपींनी त्याला मारहाण करुन त्याच्याकडील पैसे काढून घेतले. त्यानंतर त्याच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. तरुणाचा मोबाइल संचात तांत्रिक फेरफार (फाॅरमॅट) करुन आरोपी पसार झाले.
या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने नुकतीच बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत. समलैंगिकांमध्ये मैत्रीसंबंध निर्माण करण्यासाठी एका ॲपचा वापर केला जातो. या ॲपचा वापर करुन चोरट्यांनी गेल्या दोन महिन्यात पाच ते सहा जणांन लुटले आहे. धायरी भागात एका व्यावसायिकाला धमकावून चोरट्यांनी लुटले होते, तसेच मगरपट्टा सिट्टी भागात एका संगणक अभियंत्याला धमकावून लूटमार करण्यात आल्याची घटना घडली होती.